परिस्थिती गंभीर आहे!

मोदींच्या आवाहनाला फडणवीसांचा पाठिंबा

    दिनांक :11-May-2026
Total Views |
नागपूर,
Fadnavis supports Modi's appeal आखाती देशांमधील वाढत्या तणावाचा परिणाम भारतावरही जाणवू लागला असून पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचे आणि संयमाचे आवाहन केले असून त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पाठिंबा दिला आहे. नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, पंतप्रधानांनी केलेले आवाहन अत्यंत योग्य आहे. सध्याच्या परिस्थितीत तेल आणि गॅसचा वापर गरजेपुरताच करणे आवश्यक आहे. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या संघर्षामुळे इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम होत असून अनेक देशांमध्ये टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भारताने सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Fadnavis support 
 
 
फडणवीस यांनी सांगितले की, काही शेजारी देशांमध्ये पेट्रोलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र भारतात पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. तरीही नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून इंधनाचा योग्य वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनीही नागरिकांना इंधन बचत, परकीय चलनाची बचत आणि स्वदेशी वस्तूंच्या वापरावर भर देण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी पेट्रोल-डिझेलचा कमी वापर, मेट्रो आणि इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक वापर, ऑनलाइन बैठका आणि वर्क फ्रॉम होमसारख्या पर्यायांचा स्वीकार करण्याचा सल्ला दिला. तसेच पुढील काही काळ परदेश प्रवास आणि सोन्याच्या खरेदीवरही संयम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.जागतिक संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने भारतासारख्या आयातीवर अवलंबून असलेल्या देशांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार नागरिकांनी सहकार्य करून संसाधनांचा जपून वापर करावा, असे आवाहन करत आहेत.