संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा युवांमध्ये जागर व्हावा : गणेश शिंदे

- ‘मोगरा फुलला’ कार्यक्रमात शिक्षण, संस्कार आणि संत साहित्याचे महत्त्व अधोरेखित

    दिनांक :11-May-2026
Total Views |
गोंदिया, 
ganesh-shinde : संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या विचारांतून समाजाला समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश दिला असून, आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षण आणि संस्कारांच्या माध्यमातून जीवन समृद्ध करावे, असे प्रतिपादन निरूपणकार व व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले. सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित ‘मोगरा फुलला’ या सांगीतिक कार्यक्रमात ते बोलत होते.
 
 

gond 
 
 
 
सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्या पुढाकारातून ‘मोगरा फुलला’ हा कार्यक्रम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत आयोजित करण्यात येत असून, रसिकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, आयोजित कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी विजय अवधाने, दिलजीतसिंग खालसा, जयंत शुक्ला, संजीव बापट, प्रकाश उमाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना शिंदे यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनकार्यावर अभ्यासपूर्ण भाष्य केले. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’च्या माध्यमातून सामान्य जनतेसाठी अध्यात्माचे दरवाजे खुले केले आणि मातृभाषेतून ज्ञान देण्याची परंपरा निर्माण केली, असे सांगितले.
 
 
आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण हे केवळ रोजगाराचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकास आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी नमूद केले. युवकांना मार्गदर्शन करताना त्यांनी मोबाईल आणि सामाजिक माध्यमांचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले. वेळेचे नियोजन, सातत्यपूर्ण अध्ययन, चांगल्या पुस्तकांचे वाचन आणि संत साहित्याचा अभ्यास यामुळे व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात गायिका संमिता शिंदे यांनी अभंग, भारुडे आणि गवळणी सादर करून वातावरण भक्तिमय केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.