घोडाझरी नहर फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी

शेवटच्या टप्प्यातील शेतकरी हवालदिल

    दिनांक :11-May-2026
Total Views |
नागभीड,
Ghodzari canal burst शेतकर्‍यांसाठी जीवनदायी मानल्या जाणार्‍या घोडाझरी सिंचन तलावाच्या नहराला पुन्हा एकदा भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. तळोधी बाळापूर परिसरातील कात्यायनच्या बडबडा भागाजवळ नहर फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी शेतात व परिसरात वाहून जात असून, शेवटच्या टप्प्यातील शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. उन्हाळी धान पिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या काळात ही घटना घडल्याने शेतकरी हवालदिल आहेत. यावर्षी उन्हाळी धान व इतर पिकांच्या सिंचनासाठी घोडाझरी प्रकल्पातून नहरमार्गे पाणी सोडण्यात आले होते. हे पाणी शेवटच्या टोकावरील शेतांपर्यंत पोहोचत असतानाच नवानगर परिसरालगत कालव्याला अचानक भगदाड पडले. परिणामी नहरमधील मोठ्या प्रमाणातील पाणी शेतात, रस्त्यांवर व परिसरातील अंबो बोडीत साचून वाहताना दिसत आहे. त्यामुळे पाण्याची प्रचंड नासाडी होत असून, शेवटच्या टप्प्यातील अनेक शेतांपर्यंत पाणी पोहोचण्याची शक्यता कमी झाली आहे.
 
 
annal
 
 
कात्यायनच्या बडबडा परिसरातील शेतकरी हे नहरच्या शेवटच्या टोकावर असल्याने त्यांना आधीच कमी दाबाने पाणी मिळत होते. आता कालवा फुटल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. कडक उन्हाळ्यात पिकांना तातडीने पाण्याची आवश्यकता असताना सिंचन व्यवस्था कोलमडल्याने शेतकर्‍यांच्या अडचणीत भर पडली आहे. उन्हाळी धान पिकाची लागवड सुरू असतानाच निर्माण झालेल्या या संकटामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन फुटलेला कालवा दुरुस्त करावा, पाण्याची नासाडी थांबवावी आणि शेवटच्या टप्प्यातील शेतकर्‍यांना नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.