नवी दिल्ली,
Gold breaks, silver gains सोन्याची खरेदी ही भारतात केवळ आर्थिक व्यवहार नसून भावनिक आणि सांस्कृतिक परंपरेशी जोडलेली बाब मानली जाते. लग्नसमारंभ, सण आणि विशेष प्रसंगी सोन्याचे दागिने खरेदी करण्याची परंपरा देशभरात दिसून येते. अशा पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळण्याच्या आवाहनाचा परिणाम सोमवारी सराफा बाजारात दिसून आला. बाजार सुरू होताच सोन्याच्या मागणीत काही प्रमाणात घट झाली, तर दुसरीकडे चांदीच्या दरांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. व्यापारी आणि ग्राहकांमध्ये या निर्णयामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान या आवाहनामागे जागतिक आर्थिक परिस्थिती, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि भारताची चालू खात्यातील तूट ही प्रमुख कारणे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरता वाढल्याने परकीय चलन साठ्यावर दबाव निर्माण होत आहे, त्यामुळे सोन्याची आयात कमी करण्याचा अप्रत्यक्ष उद्देश या आवाहनामागे असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, बाजारात चांदीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढताना दिसत आहे. चांदीच्या दरांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली गेली असून, सोन्याच्या तुलनेत त्याची मागणी अधिक स्थिर राहिल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.