ग्राहक पंचायत कार्याचे रूपांतर लोकचळवळीत व्हावे

    दिनांक :11-May-2026
Total Views |
विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. नारायण मेहरे

यवतमाळ, 
शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी Grahak Panchayat ग्राहक पंचायतच्या कार्याचे रूपांतर हे लोकचळवळीत झाले पाहिजे. त्यासाठी सर्व वर्ग व सर्व स्तरातील अभ्यासू कार्यकर्ते या ग्राहक जागरणाच्या कामात सक्रिय सहभागी व्हावेत यासाठी ग्राहक पंचायतच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अ. भा. ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे यांनी केले.
 
 
Panchayat
 
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे संस्थापक, ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यकर्ता जिल्हा अभ्यासवर्गात ते बोलत होते. ग्राहक पंचायतचे पश्चिम क्षेत्र संघटक नितीन काकडे, प्रांत सचिव डॉ. चारुदत्त चौधरी, विदर्भ संघटक अभय खेडकर, वर्धा जिल्हा विद्युत ग्राहक आयोग अविनाश प्रभुणे, प्रांत कार्यकारिणी सदस्य हितेश सेठ, प्रचारप्रमुख तुकाराम लुटे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनंत भिसे, डॉ. केशव चेटुले यावेळी मंचावर उपस्थित होते. डॉ. मेहरे पुढे म्हणाले, ग्राहक समस्या व ग्राहकांच्या सायबर फसवणुकीचे बदलते स्वरूप लक्षात घेऊन ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांनी अद्यावत माहिती ठेवून ग्राहक प्रबोधनाचे काम अधिक जबाबदारीने करावे लागणार आहे.
 
 
 
Grahak Panchayat  क्षेत्र संघटक नितीन काकडे यांनी आपल्या भाषणात बिंदुमाधव जोशी यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. वस्तूच्या एमआरपीच्या माध्यमातून ग्राहकांच्या होणाèया शोषणाबद्दल माहिती देऊन या संदर्भात ग्राहक पंचायतने सुरू केलेल्या आंदोलनाची माहिती देऊन ‘गाव तेथे ग्राहक पंचायत’ हे बिंदुमाधव जोशी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी ग्रामीण भागात ग्राहक चळवळ विस्तारित करण्याचे आवाहन केले. प्रांत सचिव डॉ. चारुदत्त चौधरी यांनी यावेळी, पर्यावरण रक्षणासाठी ग्राहक पंचायत कार्यकर्त्यांनी सजगपणे कार्य करण्याचे आवाहन केले. वर्धा जिल्हा विद्युत ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अविनाश प्रभुणे यांनी ग्राहक संरक्षण कायदा व विद्युत कायद्यातील ग्राहकांना उपयुक्त तरतुदी संदर्भात मार्गदर्शन केले.
 
 
 
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्वामी विवेकानंद आणि स्व. बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. संजय जोशी यांनी ग्राहकगीत सादर केले. प्रा. मतीन खान, हणमंत राजनलवार, प्रमोद बाजोरिया, चंद्रकांत गड्डमवार, प्रा. देशमुख, दिलीप गुप्ता, प्रा. कमलाकर जुनघरे, रवी वाघमारे, रामदास पद्मावार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. अनंत भिसे यांनी प्रास्ताविक व स्वागतपर भाषण केले. जिल्हा सचिव डॉ. केशव चेटूले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. जिनेंद्र बंगाले, संतोष डोमळे, प्रवीण पाटील, वीरेंद्र चौबे, अ‍ॅड. राजेश पोहरे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. शांतीमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमात यवतमाळसह वणी, पांढरकवडा, घाटंजी, आर्णी, कळंब, नेर, दारव्हा, दिग्रस, पुसद, उमरखेड तालुक्यांतील ग्राहक पंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते.