नवी दिल्ली,
Hardik's farewell to Mumbai? आयपीएल २०२६ मधून मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर संघातील वातावरणाबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून झालेल्या पराभवानंतर मुंबईचे प्लेऑफचे स्वप्न भंगले आणि त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या याच्याबाबत सोशल मीडियावर अनेक दावे व्हायरल होऊ लागले. हार्दिकने मुंबई इंडियन्सला अनफॉलो केल्याचे आणि संघाशी संबंधित काही पोस्ट हटवल्याचे समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली.
या घडामोडींमुळे हार्दिक आणि मुंबई इंडियन्स व्यवस्थापनात मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. काही सोशल मीडिया पोस्टमध्ये त्याचा पुढील हंगामात दुसऱ्या फ्रेंचायझीकडे जाण्याचा दावा करण्यात आला. काहींनी त्याचे नाव चेन्नई सुपर किंग्सआणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यासोबत जोडले. तसेच संघातील काही वरिष्ठ खेळाडूंशी त्याचे संबंध ताणले गेल्याच्याही चर्चा रंगल्या. मात्र नंतर समोर आलेल्या माहितीनुसार, हार्दिकने काही काळासाठी मुंबई इंडियन्सचे अधिकृत अकाउंट अनफॉलो केले होते, पण त्यानंतर पुन्हा संघाला फॉलो केले. त्यामुळे सध्या तरी हार्दिक आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मोठा वाद झाल्याचे स्पष्ट संकेत मिळालेले नाहीत.
दरम्यान, आयपीएल २०२६ मध्ये हार्दिक पांड्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. कर्णधार म्हणून तो संघाला सातत्यपूर्ण विजय मिळवून देऊ शकला नाही. फलंदाजी आणि गोलंदाजीतही त्याचा प्रभाव मर्यादित राहिला. या हंगामात त्याने आठ सामन्यांत केवळ १४६ धावा केल्या, तर गोलंदाजीत फक्त चार विकेट्स घेतल्या. मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीनंतर व्यवस्थापनाने नेतृत्वातही बदल केला होता. शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघाची धुरा सूर्यकुमार यादव याच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र त्यानंतरही संघाला पराभवाचा सामना करावा लागला आणि मुंबईचे स्पर्धेतील आव्हान संपले. हार्दिकच्या कामगिरीमुळे आणि सोशल मीडिया हालचालींमुळे आता पुढील हंगामात मुंबई इंडियन्समध्ये मोठे बदल होण्याची चर्चा रंगू लागली आहे.