कारंजा लाड,
Illegal construction in Sindhi camp शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील कथित अवैध बांधकामाविरोधात नगर परिषद प्रशासनाने अखेर कठोर भूमिका घेत संबंधित बांधकाम सात दिवसांच्या आत स्वतः हटविण्याचे आदेश जारी केले आहेत. आदेशाचे पालन न झाल्यास महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ अंतर्गत थेट कारवाई करून बुलडोझरद्वारे बांधकाम निष्कासित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. प्राप्त माहितीनुसार, सिंधी कॅम्प परिसरातील नझूल शिट क्रमांक १०-डी अंतर्गत प्लॉट क्रमांक ६० व ६१ वर पया स्वरूपाचे बांधकाम सुरू असल्याची तक्रार बंजारा कॉलनी येथील रहिवासी विलासराऊत यांनी १६ सप्टेंबर २०२५ रोजी नगर परिषदेकडे केली होती. तक्रारीनंतर नगर परिषद प्रशासनाने १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली असता जय माता दी मंदिरामागील सिंधी कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू असल्याचे आढळून आले. त्यावेळी संबंधितांना बांधकाम तात्काळ बंद करण्याच्या याच्या मौखिक सूचना देण्यात आल्या होत्या. तक्रारीत नमूद केल्यानुसार, संबंधित दोन्ही भूखंड नमुना ड मध्ये शासन मालकीचे असल्याचा उल्लेख करण्यात आला होता.
नगर परिषद प्रशासनाच्या नोंदीनुसार संबंधितांनी अद्याप कोणतीही वैध मालकी हक्काची कागदपत्रे सादर केलेली नाहीत. नोटीस बजावल्यानंतर एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटूनही बांधकाम हटविण्यात आले नसल्याने मुख्याधिकार्यांनी अखेर अंतिम आदेश जारी केले आहेत. या आदेशाची प्रत अधिकारी, उपविभागीय तहसीलदार, भूमी अभिलेख कार्यालय, पोलिस निरीक्षक, नगर परिषद अभियंता तसेच नगर रचनाकार यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरातील इतर अवैध बांधकाम धारकांमध्येही धास्ती निर्माण झाली असून नगर परिषद प्रशासन आता अतिक्रमण विनापरवाना बांधकामांविरोधात अधिक कठोर भूमिका घेणार असल्याची चर्चा सुरू आहे.