केळझरची टेकडी माफियांच्या विळख्यात!

*प्रशासनाचे मौन संशयास्पद

    दिनांक :11-May-2026
Total Views |
सेलू,
keljar hill नागपूर-वर्धा-तुळजापूर महामार्गालगत असलेली केळझर परिसरातील ऐतिहासिक व पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाची टेकडी सध्या मुरूम माफियांच्या घशात जात असल्याचे धकादायक चित्र समोर आले आहे. दिवस-रात्र सुरू असलेल्या उत्खननामुळे संपूर्ण परिसर हादरला असून, प्रशासन मात्र मूकदर्शक बनल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
 

keljar hill 
 
 
महामार्गापासून अवघ्या काही अंतरावर सुरू असलेल्या या बेकायदेशीर उत्खननामुळे टेकडीचा नैसर्गिक समतोल ढासळत चालला आहे. मोठ्या प्रमाणात जेसीबी, हायवा आणि इतर यंत्रसामग्री वापरून टेकडी पोखरण्याचे काम सुरू असून, त्यामुळे धुळीचे साम्राज्य, प्रचंड आवाज आणि वाहतुकीचा वाढलेला धोका नागरिकांच्या जीवावर उठला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, उत्खननामुळे परिसरातील पर्यावरण धोयात आले असून भविष्यात भूस्खलनासारख्या गंभीर दुर्घटना घडण्याची शयता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, महामार्गालगत सुरू असलेल्या या कामामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे. उत्खननासाठी वापरल्या जाणार्‍या जड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे अपघाताचा धोका वाढला असल्याची भीती व्यत केली जात आहे. परिसरातील नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संतापाची लाट उसळली आहे. नेमके कोणाच्या आशीर्वादाने हा पर्यावरणाचा सौदा सुरू आहे? असा थेट सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.
पर्यावरणप्रेमींच्या मते, केळझरची टेकडी ही केवळ मातीचा ढिगारा नसून परिसराच्या पर्यावरणीय संतुलनाची ओळख आहे. काही स्वार्थी घटकांच्या फायद्यासाठी निसर्गाचा गळा घोटला जात असताना प्रशासनाची निष्क्रियता अधिकच संशय निर्माण करणारी ठरत आहे.
नागरिकांनी तात्काळ उत्खनन बंद करून टेकडीचे संवर्धन करण्याची मागणी केली असून, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. वेळीच जागे व्हा, अन्यथा उरणार फत उद्ध्वस्त डोंगर आणि धुळीने भरलेले भविष्य, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.