नवी दिल्ली,
Krunal gets emotional आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सवर रोमांचक विजय मिळवत प्लेऑफच्या शर्यतीत मोठी आघाडी घेतली. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात आरसीबीने दोन गडी राखून विजय मिळवला, तर या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचे प्लेऑफचे स्वप्न जवळपास संपुष्टात आले. या विजयात कृणाल पांड्या आणि भुवनेश्वर कुमार यांनी निर्णायक भूमिका बजावली. कृणाल पांड्याने दबावाच्या क्षणी शानदार फलंदाजी करत ७३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी उभारली, तर भुवनेश्वर कुमारने गोलंदाजीत चार विकेट घेत संघाला सामन्यात टिकवून ठेवले. शेवटच्या षटकात आवश्यक धावा काढताना भुवनेश्वरने मारलेला महत्त्वाचा फटका सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. अखेरीस शेवटच्या दोन चेंडूंवर दोन धावा आवश्यक असताना आरसीबीने विजय मिळवत मुंबईला मोठा धक्का दिला.

सामन्यानंतर मात्र सर्वांचे लक्ष वेधले ते कृणाल पांड्या आणि मुंबई इंडियन्सचे फलंदाजी प्रशिक्षक कायरोन पोलार्ड यांच्या भावनिक भेटीने. दोघांनी एकमेकांना मिठी मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला. कृणालने सांगितले की, मुंबई इंडियन्ससोबत घालवलेली वर्षे त्याच्या आयुष्यातील सर्वात खास काळ होता आणि पोलार्ड त्याच्यासाठी केवळ सहकारी नसून मोठ्या भावासारखा आहे.कृणाल म्हणाला की, मुंबई इंडियन्समध्ये खेळताना त्याने अनेक संस्मरणीय क्षण अनुभवले. पोलार्ड आणि पांड्या बंधूंची जोडी संघासाठी अनेकदा निर्णायक ठरली होती. त्याने पोलार्डचे कौतुक करताना त्याला टी-२० क्रिकेटमधील महान खेळाडूंमध्ये स्थान दिले. “एका चांगल्या माणसाला कोणीही खाली खेचू शकत नाही,” असे म्हणत कृणाल भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
त्याने पुढे सांगितले की, दबावाच्या परिस्थितीत खेळण्याची त्याला सवय आहे आणि अशा वेळी तो अधिक चांगली कामगिरी करतो. सामना स्वतः संपवायचा होता, पण ते शक्य झाले नाही, अशी खंतही त्याने व्यक्त केली. मात्र भुवनेश्वर कुमारने मारलेला फटका हा सामन्यातील सर्वोत्तम शॉट असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, हार्दिक आणि कृणाल पांड्या यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा गेल्या काही काळापासून रंगत आहेत. या हंगामात दोघेही मैदानावर फारसे एकत्र दिसले नाहीत. आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले होते. हार्दिक गुजरात टायटन्सकडे गेला, तर कृणाल लखनौ सुपर जायंट्समध्ये दाखल झाला. आता हार्दिक पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये परतला असला तरी कृणाल आरसीबीकडून खेळत आहे.