विधी शर्मा,
नागपूर,
lokesh-thota : शहरातील खड्डे, कचऱ्याचे ढिगारे, वाहतुकीची कोंडी आणि दुर्लक्षित सार्वजनिक ठिकाणे रोज डोळ्यासमोर दिसणाऱ्या या समस्या अनेकदा सवयीचा भाग बनतात. मात्र, याच प्रश्नांना व्यंगात्मक आणि आकर्षक शैलीत सोशल मीडियावर मांडत नागपूरचा तरुण लोकेश थोटा आता नागरिकांचा नवा आवाज ठरत आहे. तरुण भारतशी विशेष संवाद साधताना “नागरिकांची प्रतिक्रिया बदलेल, तरच शासनाची कृती बदलेल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नागरी समस्या मांडताना त्यांच्या व्यंगात्मक, टोचणाऱ्या शैलीबद्दल बोलताना “पूर्वी संत-महात्मे कथा आणि व्यंगाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करायचे. मीही त्याच पद्धतीने लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो,” असे लोकेश सांगतात.
लोकेश हे डिजिटल मार्केटिंग, डिजिटल कन्टेन्ट क्रिएटर आहेत. त्यांचे शिक्षण गणक विज्ञान अभियांत्रिकीत झाले आहे. तरुण भारतशी विशेष संवाद साधताना आपल्या व्यावसायिक अनुभवाचा उपयोग करत त्यांनी सामाजिक माध्यमांचा वापर केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर समाजप्रबोधनासाठी करण्याचा मार्ग निवडला असल्याचे त्यांनी सांगितले. नागरी समस्यांकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी ते विनोद, व्यंग आणि प्रभावी कथनशैलीचा आधार घेतात. सोबतच लोकेश स्वच्छता मोहीम, वाहतूक जणजागृती मोहीम राबविणाऱ्या अनेक समूहासोबत देखील कार्य करतात.
अवघ्या २० दिवसांत तीन हजारांहून अधिक नागरिकांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्याला पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे, आता अनेक नागरिक स्वतःहून त्यांच्या परिसरातील समस्या संदेशांद्वारे पाठवत आहेत. कचरा, वाहतूक, प्रशासनाचे दुर्लक्ष किंवा इतर नागरी प्रश्न अशा प्रत्येक विषयाला लोकेश वेगळ्या आणि प्रभावी पद्धतीने लोकांसमोर आणतात.
“समस्या दिसली की ती अधिक आकर्षक आणि व्यंगात्मक पद्धतीने लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल, हा पहिला विचार मनात येतो,” असे ते सांगतात. अनेक वर्षांचा चित्रफीत निर्मिती आणि डिजिटल क्षेत्रातील अनुभव यासाठी उपयोगी ठरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
फुटाळा तलाव परिसरातील स्वच्छतेच्या प्रश्नावर त्यांनी केलेले काम विशेष चर्चेत आले. प्रजासत्ताक दिनी स्वच्छता अभियान राबवल्यानंतरही तलावाच्या मागील भागात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला होता. यावर लोकेश आणि त्यांच्या स्वयंसेवकांनी तयार केलेल्या चित्रफितींमुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आणि स्वच्छता मोहिमेला गती मिळाली.
“प्रश्न विचारा आणि तो चारचौघांत जोरात विचारा,” असा संदेश ते तरुणांना देतात. नागरिकांनी समस्या दुर्लक्षित केल्यास बदल होत नाही; मात्र आवाज उठवला, प्रश्न विचारले आणि प्रतिक्रिया दिली तर प्रशासनालाही कृती करावी लागते.