नागपूर,
Lyricist Zaheer Alam passes away ९० च्या दशकात प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या “तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे...” या गाजलेल्या गीताचे गीतकार झहीर आलम यांचे रविवारी रात्री नागपुरात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने नागपूरच्या साहित्य, गझल आणि संगीत क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मोमीनपुरा परिसरात वास्तव्यास असलेले झहीर आलम यांचे जीवन अत्यंत संघर्षमय राहिले. सुरुवातीला त्यांनी एम्प्रेस मिलमध्ये नोकरी केली होती. मिल बंद पडल्यानंतर त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, गीतलेखन आणि शायरीची आवड त्यांनी अखेरपर्यंत जपली.
त्यांनी लिहिलेले “तुम तो ठहरे परदेसी” हे गीत प्रसिद्ध गायक अल्ताफ राजा यांच्या आवाजात देशभर गाजले. १९९० च्या दशकात कॅसेट संस्कृतीच्या काळात हे गाणे अक्षरशः घराघरात पोहोचले होते. विरह आणि वेदनेची भावना व्यक्त करणाऱ्या या गीताने रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. विशेष म्हणजे हे गीत सुरुवातीला स्थानिक कार्यक्रमांत सादर केले जात होते. नंतर अल्ताफ राजा यांच्या अल्बममधून प्रसिद्ध झाल्यानंतर ते सुपरहिट ठरले. या गाण्यामुळे अनेकांना प्रसिद्धी मिळाली; मात्र झहीर आलम यांना अपेक्षित आर्थिक लाभ मिळाला नसल्याची खंत त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केली. झहीर आलम यांनी गझल, कव्वाली आणि हिंदी गीतलेखन क्षेत्रातही उल्लेखनीय काम केले. त्यांच्या लेखणीतून सामान्य माणसाच्या भावना, विरह आणि जीवनातील वेदना प्रभावीपणे व्यक्त होत असत. त्यांच्या निधनानंतर साहित्य, संगीत आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली असून सोशल मीडियावरही शोक व्यक्त करण्यात येत आहे.