संस्कृत संशोधकांसाठी सुवर्णसंधी

‘महाकवी कालिदास संस्कृत-व्रती’ पुरस्कारासाठी नामनिर्देशन सुरु

    दिनांक :11-May-2026
Total Views |
नागपूर, 
mahakavi-kalidas-sanskrit-vrati-award : संस्कृत भाषा, साहित्य आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विद्वानांचा सन्मान करण्यासाठी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातर्फे प्रतिष्ठेच्या ‘महाकवी कालिदास संस्कृत-व्रती राष्ट्रीय पुरस्कार’साठी आवेदन व नामनिर्देशन मागविण्यात आले आहेत. संस्कृत भाषेच्या प्रचार, प्रसार आणि संवर्धनासाठी आयुष्यभर कार्य करणाऱ्या ज्येष्ठ तसेच युवा विद्वानांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
 

mahakavi-kalidas-sanskrit-vrati-award 
 
 
पंडित रामनारायण शर्मा वैद्य यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने दिला जाणारा हा पुरस्कार यंदा सोळाव्या वर्षात पदार्पण करत आहे. समाजात संस्कृत भाषेला गौरवपूर्ण स्थान प्राप्त करून देण्यासाठी योगदान देणाऱ्या विद्वज्जनांचा यथोचित गौरव व्हावा, हा या पुरस्कारामागील मुख्य उद्देश आहे.
 
या पुरस्काराअंतर्गत ज्येष्ठ विद्वानाला ५० हजार रुपये रोख, तर युवा विद्वानाला २५ हजार रुपये रोख व गौरवपत्र प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी पद्मश्री सत्यव्रत शास्त्री, प्रा. राधावल्लभ त्रिपाठी, डॉ. मणि द्रविड, प्रा. अरिंदम चक्रवर्ती, प्रा. बलराम शुक्ल यांसारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या विद्वानांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
 
संस्कृत साहित्य, संशोधन, भाषांतर आणि संस्कृत भाषेच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केलेल्या विद्वानांकडून आवेदन मागविण्यात आले आहेत. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्याला मान्यता मिळालेल्या ४८ वर्षांवरील ज्येष्ठ विद्वान आणि ३५ ते ४८ वयोगटातील युवा विद्वान यांना अर्ज करता येणार आहे.
 
आवेदनाची अंतिम मुदत ३० जून असून आवश्यक कागदपत्रांसह अर्जाच्या चार प्रती विश्वविद्यालयाकडे सादर कराव्या लागणार आहेत. तसेच अर्जाची सॉफ्ट प्रत विद्यापीठाच्या अधिकृत ई-मेलवर पाठविण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. रोशन अलोने यांनी केले आहे. संस्कृत क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती अथवा संस्था विद्वानांची शिफारसही करू शकतात.