सोमनाथ,
modis visit to somnath नरेंद्र मोदी आज गुजरातच्या एकदिवसीय दौऱ्यावर असून त्यांनी सोमनाथ मंदिर येथे आयोजित ‘सोमनाथ अमृत पर्व-२०२६’ कार्यक्रमात सहभाग घेतला. भगवान सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान सकाळी हेलिकॉप्टरने सोमनाथ येथे दाखल झाले. त्यानंतर हेलिपॅडपासून मंदिरापर्यंत सुमारे एक किलोमीटर लांबीचा भव्य रोड शो काढण्यात आला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या नागरिकांनी ‘हर हर महादेव’च्या जयघोषात पंतप्रधानांचे स्वागत केले.
या विशेष सोहळ्यानिमित्त संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक रोषणाई आणि पारंपरिक सजावटीने उजळून निघाला होता. मंदिर परिसराला वधूप्रमाणे सजवण्यात आले होते. पंतप्रधान मोदी मंदिरात पोहोचल्यानंतर त्यांनी विशेष पूजा, यज्ञ आणि अभिषेक विधींमध्ये सहभाग घेतला. देशातील ११ पवित्र तीर्थक्षेत्रांहून आणलेल्या पवित्र जलाने मंदिराचा अभिषेक करण्यात आला. या वेळी वातावरणात मंत्रोच्चार आणि शिवभक्तीचा गजर घुमत होता.
कार्यक्रमादरम्यान भारतीय हवाई दलाच्या सूर्य किरण ॲक्रोबॅटिक टीम पथकाने हवाई कसरती सादर केल्या. मंदिरावर फुलांची उधळण करण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ओडिशातील कलाकार नारायण साहू आणि सुब्रता महाराणा यांनी भगवान शिव आणि सोमनाथ मंदिराच्या वाळूच्या आकर्षक मूर्ती साकारल्या. ७५ ढोल, शंख आणि डमरूंच्या गजरात पंतप्रधानांचे स्वागत करण्यात आले, तर पारंपरिक वेशभूषेतील मुलींनी ‘कलश नृत्य’ सादर केले.
यावेळी पंतप्रधान मोदींनी मंदिर परिसरातील विशेष प्रदर्शनालाही भेट दिली. या प्रदर्शनात सोमनाथ मंदिराचा प्राचीन इतिहास, मंदिरावर झालेले आक्रमण आणि त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने झालेल्या पुनर्बांधणीचा प्रवास सादर करण्यात आला.modis visit to somnath एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून मंदिराच्या इतिहासाची दुर्मिळ छायाचित्रे आणि स्लाइड शो दाखवण्यात आले.
या प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण म्हणजे पंतप्रधान मोदींचा संदेश होता. “आपली आध्यात्मिक शक्ती ही विकसित भारत घडवण्याच्या मुळाशी असलेली सर्वशक्तिमान शक्ती आहे,” असे त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले.
सोमनाथ मंदिरात पूजा आणि दर्शनानंतर पंतप्रधान दुपारी जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर ते सागर दर्शन सर्किट हाऊसमध्ये थोडा वेळ मुक्काम करतील. सायंकाळी ते वडोदरा येथे रवाना होणार असून तेथे ‘सरदार धाम’चे उद्घाटन करतील आणि मोठ्या जाहीर सभेला संबोधित करतील. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी वडोदऱ्यात त्यांचा भव्य रोड शोही आयोजित करण्यात आला आहे.