सिरोंचा,
Moyabinpetha Group Pvt. ग्रामपंचायत मोयाबिनपेठा अंतर्गत झालेल्या विविध विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करत गावकर्यांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. ग्रामपंचायत कार्यालयासमोर मंगळवार, 12 मे रोजी सकाळी 11 वाजेपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा शिवसेना कार्यकर्ते संतोष चंद्रय्या चंदावार यांनी केली. सिरोंचा येथील स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष गणेश बोधनवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना संतोष चंदावार यांनी ग्रामपंचायत मोयाबिनपेठा अंतर्गत मोयाबिनपेठा, बोंड्रा, बोगुटागुडम, दर्शेवाडा आणि झेंडा या पाच गावांमध्ये सन 2021-22 ते 2025-26 या कालावधीत विविध योजनांमधून आलेल्या निधीचा मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचा आरोप केला. ग्रामपंचायतीची लोकसंख्या 3 हजार 865 असून, अनेक विकासकामांसाठी निधी खर्च दाखविण्यात आला असला तरी प्रत्यक्षातकामे अपूर्ण व निकृष्ट दर्जाची असल्याचा दावा करण्यात आला.
गावकर्यांच्या म्हणण्यानुसार, जल जीवन मिशन अंतर्गत लाखो रुपये खर्च करून नळयोजना राबविण्यात आली. मात्र आजपर्यंत एकाही घरात नियमित पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. तसेच कार्यरत सरपंच व उपसरपंच यांच्या संपूर्ण कार्यकाळात एकही ग्रामसभा किंवा मासिक सभा प्रत्यक्षात घेण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला. संगणक प्रणालीवर ग्रामसभा झाल्याची नोंद अपलोड करण्यात आली, मात्र गावकर्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. पेसा अबंध निधी, 15 वा वित्त आयोग निधी, ग्रामनिधी, पाणीपुरवठा निधी तसेच स्वच्छ भारत अभियान निधीमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला. घनकचरा व्यवस्थापनाची कोणतीही कामे न करता निधी खर्च दाखविण्यात आल्याचा दावा गावकर्यांनी केला.
याशिवाय ग्रामपंचायत क्षेत्रातील घरांचे सर्वेक्षण व मोजमाप शासनाच्या नियमांनुसार न करता खासगी व्यक्तींमार्फत करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. प्रत्येक कुटुंबाकडून 300 ते 600 रुपये वसूल करून अंदाजे 4 ते 5 लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या सर्वेक्षणाला ग्रामसभेची मंजुरी नसल्याने ते बोगस असल्याचा आरोप गावकर्यांनी केला आहे.
गावकर्यांनी यापूर्वी पंचायत समिती सिरोंचा तसेच जिल्हा परिषद गडचिरोली येथे अनेकदा निवेदने सादर केली होती. 13 मार्च, 2 एप्रिल, 8 एप्रिल आणि 29 एप्रिल 2026 रोजी चौकशी समित्यांनी ग्रामपंचायतीची चौकशीही केली. मात्र, या चौकशीत न्याय मिळाला नसल्याने आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. प्रशासन या आंदोलनावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.