नागपूर,
nagpur-university-result : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांच्या निकालांमधील गंभीर त्रुटी दिवसेंदिवस समोर येत असून, विद्यार्थ्यांचा संताप तीव्र होत आहे. तब्बल चार महिन्यांच्या विलंबानंतर जाहीर करण्यात आलेल्या निकालांमध्ये इतक्या प्राथमिक चुका आढळत आहेत की, अनेक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवर त्यांनी नेमकी कोणत्या वर्षाची परीक्षा दिली, हेही नमूद करण्यात आलेले नाही. निकाल जाहीर झाल्याची तारीखसुद्धा अनेक गुणपत्रिकांवर नसल्याने गुणपडताळणीसाठी मुदत कोणती ग्राह्य धरायची, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे.
विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार, काही गुणपत्रिकांमध्ये चुकीचे विषय नमूद करण्यात आले असून अनेकांना ‘अनुपस्थित’ दाखविण्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनही अनुत्तीर्ण घोषित करण्यात आले आहे. अंतर्गत गुणांची नोंद चुकीच्या पद्धतीने करण्यात आली असून हे गुण नेमके कितीपैकी आहेत, याचाही उल्लेख अनेक ठिकाणी आढळत नाही. काही विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज चुकीची असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
निकाल पाहण्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दोन-दोन दिवस प्रवेश मिळत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. अडचणी सोडविण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या मदतकेंद्र क्रमांकांवर संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची अधिकच गैरसोय होत आहे. अनेक विद्यार्थ्यांनी सलग काही दिवस प्रयत्न करूनही दूरध्वनी उचलले जात नसल्याचे सांगितले.
दरम्यान, परीक्षा विभाग उन्हाळी परीक्षांच्या आयोजनात व्यस्त असतानाच हा गोंधळ उघडकीस आल्याने प्रशासकीय कामांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. प्रवेशपत्र वितरण, परीक्षा अर्ज प्रक्रिया आणि निकाल दुरुस्ती यामुळे विभागाची धावपळ वाढली आहे.
उपकुलसचिव मोतीराम तडास यांनी गुणपत्रिकांमधील चुका दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले. विज्ञान शाखेच्या हजारो निकालांमध्ये सुधारणा सुरू असून कला शाखेच्या जवळपास वीस हजार गुणपत्रिकांमध्ये त्रुटी आढळल्याची माहिती त्यांनी दिली.
सिनेट सदस्य मनमोहन बाजपेयी यांनी कुलगुरूंना पत्र पाठवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ नये, यासाठी विद्यापीठाने त्वरित सक्षम यंत्रणा उभी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.