सेवा, समता आणि मानवतेचा तेजस्वी संगम

    दिनांक :11-May-2026
Total Views |
नंददीप फाउंडेशनचा चौथा वर्धापन दिन उत्साहात
 
यवतमाळ, 
Nanddeep Foundation नागपूर-तुळजापूर महामार्गावरील अर्जुना गावालगत बोथबोडन रोड येथे नंददीप संस्थेचा चौथा वर्धापन दिन सोहळा अत्यंत आनंदमय, भावपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात झाला. यात मानवतेच्या उदात्त भावनेतून उभारलेल्या नंददीप फाउंडेशनच्या सेवायात्रेतील एक अभिमानास्पद आणि हृदयस्पर्शी पर्वाची अनुभूती मिळाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिओम बाबूजी भूत होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, अनंत कौलगीकर, दत्तात्रय देशपांडे, प्रा. घनश्याम दरणे, डॉ. शीकांत मेशाम, डॉ. प्रवीण राखुंडे, डॉ. कविता बोरकर यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
 
 

Nanddeep
 
उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी आपल्या भाषणातून समाजाच्या अंतर्मनाला स्पर्श करणारा संदेश दिला. प्रत्येक कुटुंबाने आपल्या वृद्ध आणि मनोरुग्ण सदस्यांची जबाबदारी स्वीकारली, तर नंददीपसारख्या संस्थांची गरजच भासणार नाही. मात्र, आज ही संस्था 24 तास अविरत धावणारी जीवनदायी शक्ती ठरली आहे, असे त्यांनी सांगितले. प्रा. घनश्याम दरणे यांनी नंददीपच्या कार्याला लोकचळवळ असे संबोधत, ही सेवा आता घराघरात पोहोचत असल्याचे गौरवोद्गार काढले. या सोहळ्याची खरी ओळख ठरली ती केंद्रातील बेघर मनोरुग्ण बांधवांची उत्स्फूर्त सहभागिता, अंकिता, मीरा, रसिका भगत यांच्यासह अनेक महिला व पुरुषांनी सादर केलेल्या नृत्याविष्कारांनी वातावरण अक्षरशः भारावून गेलेजिथे प्रत्येक हास्य हेच देवपूजेचे रूप भासत होते.
 
 
Nanddeep Foundation  सुनीता भितकर, हर्षाली शिंदे, रितिका गजबे, रितिका शिंदे यांच्या नृत्यांनी कार्यक्रमात आनंदाची लहर निर्माण केली आणि प्रत्येक उपस्थिताच्या मनात उत्साहाचा झरा उगम पावला. उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांचा डॉ. रेश्मा कंकाळ व डॉ. शोभा डोडेवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. नंददीप फाउंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत 750 हून अधिक बेघर मनोरुग्ण बांधवांना आधार, उपचार आणि पुनर्वसन मिळाले आहे. यावेळी अविनाश धनेवार, मेजर मनोज तामगाडगे, डॉ. विजय चाफले, राजू आजनकर, पल्लवी गिराम, पूनम शिंदे, जोत्स्ना आत्राम या सेवाभावी कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे संचालन निशांत सायरे यांनी, तर आभारप्रदर्शन मनोज पवार यांनी केले.