अमरावती,
national-yoga-competition : विदर्भातील थंड हवेचे ठिकाण चिखलदरा येथे अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातर्फे १९७७ पासून उन्हाळी योग शिबिर सुरू असून, सोबतच तेथे योग, निसर्गोपचार केंद्राची स्थापना सुध्दा करण्यात आली. हे वर्ष शिबिराचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्त मंडळाच्या या योग केंद्रात १५ व १६ मे रोजी योग व निसर्गोपचार संमेलन, आजी माजी शिबिरार्थांचा मेळावा व विविध वयोगटांतील मुले-मुली, स्त्री-पुरुषांकरिता राष्ट्रीय योगासन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून या सोहळा व स्पर्धांना जवळपास तीनशे योगप्रेमी सहभागी होतील.
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्याहस्ते या स्पर्धा व संमेलनाचे उदघाटन होणार असल्याची माहिती हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, सचिव प्रा. डॉ. माधुरी चेंडके व डॉ. अरुण खोडस्कर यांनी दिली. ११ मे ते ३१ मे पर्यंत लहान मुलेमुली, तरुण-तरुणी व प्रौढ स्त्री-पुरुषांकरिता येथे योग व निसर्गोपचार प्रशिक्षण वर्ग चालविले जातात. त्याचप्रमाणे वृद्ध व व्याधीग्रस्तांकरिता निसर्गोपचाराची व्यवस्था असते. यामध्ये जवळपास शंभर ते दीडशे शिबिरार्थी भाग घेत असतात. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, व्यापारी, शेतकरी, व्याधीग्रस्त इत्यादी सहभागी होत असतात.
संमेलनाचे उद्घाटन १५ मे रोजी सकाळी ११ वाजता मंडळाच्या सचिव व उपप्राचार्या डॉ. माधुरी चेंडके यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरचे लोकमतचे संपादक व साहित्यिक श्रीमंत माने करतील. यावेळी मंडळाच्या डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्यूकेशनचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास देशपांडे, चिखलदरा नगर परिषदेचे अध्यक्ष शेख अब्दुल शेख हैदर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी धीरजकुमार गोहाड, वनाधिकारी अनंत डिगोळे उपस्थित असतील. विशेष उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगरचे योगतज्ज्ञ डॉ. उत्तमराव काळवणे, तसेच ठाण्याच्या घंटाळी योग केंद्राच्या योग व स्त्रिरोग तज्ज्ञ डॉ. उलका नातू असतील.
उद्घाटनानंतर योग तज्ज्ञांची व्याख्याने, योगोपचार मार्गदर्शन, संशोधन पेपर वाचन, प्रात्यक्षिक इ. चे आयोजन होईल. १६ मे रोजी पहाटे ध्यान, धारणा, प्राणायाम, शुध्दीक्रिया आदीचा सराव होईल. मंडळाचे योग मार्गदर्शक प्राचार्य डॉ. अरुण खोडस्कर मार्गदर्शन करतील. त्यानंतर विविध वयोगटांतील मुले मुली, स्त्री-पुरुषांकरिता योगासन स्पर्धा आयोजित होईल. शेवटी सायंकाळी ४ वाजता समारोप व बक्षीस वितरण समारंभ मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके यांच्या अध्यक्षतेखाली मेळघाटचे आमदार केवलराम काळे, चिखलदरा नगरसेवक आल्हाद कलोती, समाजसेवक चंद्रकांत जाजोदिया, चिखलदरा वनप्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या मुक्ता टेकाडे यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते रंगीत स्मरणिका प्रकाशित होईल. यामध्ये तज्ज्ञांचे लेख, चिखलदरा परिसराची माहिती असेल.