अनिल कांबळे,
नागपूर,
hit-and-run : भरधाव वाहनाने रस्त्याने पायी जाणाऱ्या एका व्यक्तीला जबर धडक दिली आणि पळून गेला. गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला जवळपास तासाभराने आलेल्या एका वाहनाने मदत केली. मात्र, जखमीवर उपचार सुरु असताना जखमीचा मृत्यू झाला. विरेंद्र राजभान कुशवाह (वय 48, रा. गुलमाेहर नगर, कळमना) असे जखमीचे नाव आहे.
पारडी पाेलिस ठाण्याचे हद्दीतील नागपूर-भंडारा हायवे, कापसी एजन्सी परिसरात रविवारी मध्यरात्री 2 वाजता रात्रगस्त करीत हाेते. यावेळी त्यांना दाेन जागरूक नागरिकांनी हरी ढाब्याजवळील राेडजवळ एक जखमी व्यक्ती बेशुध्दावस्थेत पडलेला असल्याची माहिती दिली. त्यानुसार बिटमार्शल यांनी घटनास्थळी जाऊन बघितले असता, तेथे वीरेंद्र कुशवाह बेशुध्दावस्थेत जखमी झालेला दिसला. अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव, धाेकादायकरित्या चालवून धडक देऊन, गंभीर जखमी करून पळून गेला. पाेलिसांनी जखमीला मेयाे हाॅसपीटल येथे नेले असता डाॅक्टरांनी मृत घाेषित केले. याप्रकरणी तक्रारीवरून पारडी पाेलिसांनी अज्ञात वाहन चालक आराेपीविरूध्द गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.