pm-surya-ghar-free-electricity-scheme : केंद्र सरकारच्या ‘पीएम सूर्य घर - मोफत वीज योजना’ मुळे नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात सौरऊर्जेची मोठी चळवळ उभी राहत असून, नागपूर परिमंडळाने महाराष्ट्रात आघाडीचे स्थान मिळवले आहे. महावितरणच्या माहितीनुसार, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील तब्बल १ लाख ७०८ घरांनी छतावरील सौरऊर्जा प्रणाली बसवून हरित ऊर्जेकडे महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.
या योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ८२ हजार ६०१ ग्राहकांनी, तर वर्धा जिल्ह्यातील १८ हजार १०७ ग्राहकांनी सौरऊर्जेचा स्वीकार केला आहे. या प्रकल्पांमुळे एकूण ३८२.६ मेगावॅट वीज निर्मिती क्षमता निर्माण झाली असून, त्यामध्ये नागपूरचा वाटा ३१७.८२ मेगावॅट इतका आहे. महाराष्ट्रातील महावितरणच्या एकूण सौर प्रकल्पांपैकी जवळपास १८ टक्के प्रकल्प केवळ नागपूर परिमंडळात कार्यान्वित झाले आहेत.
घरांच्या छतांवर सौरऊर्जा निर्मिती करून कुटुंबांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेत केंद्र सरकारकडून थेट अनुदान दिले जाते. एक किलोवॅट क्षमतेसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेसाठी ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या मते, सौरऊर्जा प्रणालीवर केलेली गुंतवणूक तीन ते चार वर्षांत वसूल होते. त्यानंतर पुढील वीस ते पंचवीस वर्षे ग्राहकांना अत्यल्प खर्चात वीज वापरता येते. याशिवाय अतिरिक्त वीज ग्रीडला पुरवून ग्राहकांना आर्थिक लाभही मिळतो.
महावितरण नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप डोडके यांनी नागरिक, गृहनिर्माण संस्था आणि सदनिकाधारकांना या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. हरित ऊर्जा स्वीकारून पर्यावरण संरक्षणासोबतच आर्थिक बचतीची संधी नागरिकांनी साधावी, असे त्यांनी म्हटले आहे.