देवळीत पत्रकार परिषदेत नमो उद्यानवरून आरोप प्रत्यारोप

    दिनांक :11-May-2026
Total Views |
देवळी,
Press conference at the temple वर्धा मार्गावरील बालाजीनगर येथील आधीच विकसित असलेल्या बगीच्यावर ८८ लाख रुपये खर्चून नमो उद्यान उभारण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप नप सभागृहात आयोजित संयुत पत्रकार परिषदेत भाजपा तडस गट व काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला. वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान २०२५-२६ अंतर्गत प्रभाग २ मधील वर्धा मार्गावरील बालाजी नगर येथील खुल्या जागेत नमो उद्यान विकसित करण्यासाठी आज ११ रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या कामासाठी सर्वात कमी दराच्या निविदेला मंजुरी देण्याचा विषय सभेपुढे ठेवण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावाला भाजपा आणि काँग्रेसच्या ११ सदस्यांनी विरोध दर्शविला. काँग्रेसचा एक नगरसेवक तठस्थ राहिला. सुविधा असलेल्या उद्यानावर पुन्हा ८८ लाखांचा खर्च करणे संशयास्पद असल्याचा आरोप नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केला.
 
 
 
 
देवळी शहरात आधुनिक सुविधा असलेले नमो उद्यान व्हावे, अशी इच्छा आहे. मात्र शासन निर्णयानुसार अविकसित जागेवर उद्यान उभारणे अपेक्षित असताना अस्तित्वात असलेल्या बगीच्यावरच हा प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आले. बालाजीनगरऐवजी शहरातील दुसर्‍या अविकसित जागेची निवड करून तेथे नमो उद्यान उभारण्याची मागणी विरोध करणार्‍या नगरसेवकांनी केली. गटनेते उमेश कांमडी, नगरसेवक अनिल कारटकर, विजय गोमासे, शिक्षण सभापती शुभांगी कुर्जेकर, मनीषा लोखंडे तसेच काँग्रेसचे नगरसेवक मिलिंद देशमुख या भाजपा व काँग्रेसच्या १४ नगरसेवकांनी मुख्याधिकारी नेहा अकोले यांना दुसर्‍या जागी नमो उद्यान तयार करावे आमचा नमो उद्यानला विरोध नाही पण विकसित बगीच्या झाला असताना त्या जागी होऊ नये असे निवेदन त्यांनी दिले.  या संदर्भात नप उपाध्यक्ष राहुल चोपडा यांच्या सोबत संपर्क साधला असता ते म्हणाले की, प्रशासकाच्या काळात जागा ठरवल्या गेली. जिल्हाधिकार्‍यांनी त्याला मान्यता दिली आहे. महाराष्ट्र शासनाचे नमो उद्यानाला मोठे बक्षीस असल्याने आम्ही त्या जागेचा प्रस्ताव ठेवला. उर्वरित निधीतून या उद्यानाचे सौंदर्यीकरण होणार असल्याचे चोपडा यांनी सांगितले.