पंजाबचा हत्यार तस्कर अटकेत

-पाचोरीत शस्त्र उद्योग जोरावर -७ पिस्तुल, मॅगजिन व रोख हस्तगत

    दिनांक :11-May-2026
Total Views |
धारणी, 
punjab-arms-smuggler-arrested : पंजाब प्रांतातील आंतरराज्यीय शस्त्र तस्कर रणजीत शंभुनाथ (३२) हा ७ देशी बनावटीच्या ७ पिस्तुली, २ मॅगजीन, मोबाईलसह मध्य प्रदेशच्या बुरहानपूर पोलिसांच्या हाती लागल्याने एकच खळबळ माजलेली आहे. ही कारवाई काल करण्यात आली.
 
 
amt
 
 
 
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या घनदाट जंगलाजवळच्या पाचोरी (खकनार, मध्य प्रदेश) गावात सर्रासपणे अवैध शस्त्रे निर्मितीचे गृहउद्योग चालत असल्याचा सज्जड पुरावा पोलिसांच्या हाती लागल्याने मोठ्या कारवाईची शक्यता वाटत आहे. धारणीपासून ५० कि. मी. अंतरावरील बोरखेडा फाट्यावर एक अनोळखी परप्रांतीय युवक संशयास्पद स्थितीत उभा असल्याची माहिती खकनार पोलिसांना प्राप्त झाली होती. अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंतरसिंग कनेकश व उपविभागीय पोलिस अधिकारी निर्भयसिंग अलावा (नेपानगर) यांच्या मार्गदर्शनात खकनारचे ठाणेदार अभिषेक जाधव यांनी पोलिस पथकाला मोक्यावर पाठवून हत्यार तस्कराला मुद्देमालसह अटक केली. हत्यार कोणाकडून विकत घेतली, या बाबतीत चौकशी सुरू आहे.
 
 
 
पंबाज राज्यातील पटीयाला जिल्ह्यातील नाभा पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या कृष्णपुरी गावातील रणजीत शंभुनाथ (३२) जवळून ७ पिस्तुल, २ मॅगजीन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. मेळघाटच्या जंगलास लागून असलेल्या खकनार तालुक्यातील गाव पाचोरी येथे सिकलीगर नावाने ओळखले जाते. येथील अनेक कुटुंब गृह उद्योग म्हणून जापानी व चायनाच्या बनावटीची शस्त्रे तयार करतात. अनेक वेळा मध्य प्रदेश पोलिसांनी कारवाई केली. मात्र निर्मिती बंद झालेली नाही. आता आंतरराज्यीय शस्त्र तस्कर हाती लागल्याने प्रकरण गंभीर झालेले आहे. पुढच्या वर्षी पंजाब राज्यात विधानसभेची निवडणूक असल्याने पाचोरीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. महाराष्ट्राच्या सीमेत प्रवेश करुन शस्त्र निर्माते शरण घेत असतात, हे विशेष!