तिवसा,
revenue-assistant : तिवसा तहसील कार्यालयातील एका महसूल सहाय्यकाला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने सोमवारी दुपारी रंगेहाथ पकडल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. राहुल शंकरराव निस्वादे (वय ४३), महसूल सहाय्यक, तहसील कार्यालय तिवसा (वर्ग-३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी लोकसेवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध तहसील कार्यालयात प्रतिबंधक कारवाईचे एक प्रकरण सुरू होते. सदर प्रकरणात वारंवार तारखा न देता प्रकरण लवकर निकाली काढण्यासाठी महसूल अधिकारी राहुल निस्वादे यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार ८ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती यांच्याकडे करण्यात आली होती. तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीने पडताळणी कारवाई सुरू केली. सोमवार ११ मे रोजी करण्यात आलेल्या पडताळणीदरम्यान आरोपीने तडजोडीअंती १५०० रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर एसीबीच्या पथकाने तिवसा तहसील कार्यालयात सापळा रचला. दुपारी सुमारे १२.४५ वाजताच्या सुमारास महसूल अधिकारी राहुल निस्वादे यांनी तक्रारदाराकडून पंचांसमक्ष १५०० रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. संबंधित आरोपीविरुद्ध तिवसा पोलिस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदरची यशस्वी कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलिस उपअधीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चित्रा मेसरे तसेच सुधीर चर्जन, युवराज राठोड, वैभव जायले, सतीश किटुकले तसेच पथकातील अधिकार्यांनी पार पाडली.