सरपंच मनोहर बोदलवार ग्रामरत्न सरपंच पुरस्काराने सन्मानित

    दिनांक :11-May-2026
Total Views |
चामोर्शी,
Sarpanch Manohar Bodalwar पंचायत राज विकास मंच संचालित अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्या वतीने महाबळेश्‍वर-पंचगणी येथे ग्रामरत्न सरपंच गौरव सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात देशभरातील उल्लेखनीय कार्य करणार्‍या सरपंचांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी गडचिरोली जिल्ह्यातील व चामोर्शी तालुक्यातील तळोधी मोकासा येथील सरपंच मनोहर पत्रुजी बोदलवार यांनी ग्रामविकासातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना सपत्नीक ग्रामरत्न सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे ते गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव सरपंच ठरले आहेत.
 

Firefight in Adgaon 
 
 
कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपाध्यक्ष हुकुमचंद आमदरे, संस्थापक अध्यक्ष जयंत सर्जेराव पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, देशभरातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, प्रतिष्ठित मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमात ग्रामीण विकास, स्वच्छता व पाणीपुरवठा, शिक्षण व सामाजिक उपक्रम आदी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या सरपंचांचा गौरव करण्यात आला. ग्रामीण भाग नेहमीच विकासापासून दूर असतो. या भागाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा व गती देण्यासाठी सरपंचाची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली. या सन्मानामुळे मनोहर बोदलवार यांच्या कार्याला नवी ओळख मिळाली असून भावी सरपंचांसाठी ते प्रेरणायी ठरले आहेत. त्यांच्या सन्मानाबद्दल ग्रामपंचायत प्रशासकीय सदस्य विनोद सातपुते, किशोर कुनघाडकर, गुरुदास गेडाम, हिरामण बिश्राम, तृप्ती चिळंगे, लता वासेकर, ज्योती बारसागडे, विद्या मेश्राम, सुनीता चाटारे, शोभा तोडासे व गावातील नागरिकांनी मनोहर बोदलवार यांचे अभिनंदन केले आहे.