भोपाळ,
protect tigers green chain राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण अर्थात एनटीसीएने मध्य भारतातील वाढत्या वाघांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाकांक्षी योजना तयार करण्यास सुरुवात केली आहे. वाघांचे संवर्धन, सुरक्षित स्थलांतर आणि जंगलांमधील नैसर्गिक हालचाल कायम ठेवण्यासाठी सात राज्यांना जोडणारा सुमारे ३० हजार चौरस किलोमीटरचा विशाल ‘व्याघ्र मार्ग’ उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे वाघांना एका जंगलातून दुसऱ्या जंगलात सुरक्षितपणे स्थलांतर करता येणार असून, मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासही मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या महत्त्वाकांक्षी योजनेत मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, राजस्थान, ओडिशा आणि महाराष्ट्र या सात राज्यांतील प्रमुख व्याघ्र प्रकल्पांना एकमेकांशी जोडले जाणार आहे. यामध्ये बांधवगड व्याघ्र प्रकल्प, संजय डुबरी व्याघ्र प्रकल्प, गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान, पलामाऊ व्याघ्र प्रकल्प, मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्प, सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प, सातकोसिया व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्प यांसारख्या व्याघ्र प्रकल्पांचा समावेश आहे.
एनटीसीए सातही राज्यांतील वन विभाग आणि सुरक्षा यंत्रणांच्या समन्वयातून संयुक्त सुरक्षा व्यवस्था उभारण्याचाही विचार करत आहे. या माध्यमातून वाघांची हालचाल, शिकारीवर नियंत्रण आणि संवर्धनाच्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवता येतील. मध्य प्रदेशात वाढत्या वाघांच्या मृत्यूमुळे हा विषय गंभीर बनला असून, जंगलांमधील नैसर्गिक मार्ग सुरक्षित ठेवणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र अभयारण्य मध्ये वाघांची संख्या वाढल्याने संवर्धनाची स्थिती तुलनेने चांगली असल्याचे मानले जाते. मात्र, संरक्षित क्षेत्राच्या बाहेरील भागात मानव-वन्यजीव संघर्ष वाढत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक आणि वाघ दोघांसाठीही धोका निर्माण झाला आहे. वाढत्या वाघसंख्येमुळे अनेक वाघ नवीन अधिवासाच्या शोधात जंगलाबाहेर पडत आहेत.
अलीकडेच अचानकमार व्याघ्र अभयारण्य येथील १७ वर्षीय वाघिणीने मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यातील पूर्व करंजिया वनक्षेत्रात आश्रय घेतल्याचे समोर आले. या वाघिणीने ५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पार करत विंध्य-मैकल-सातपुडा व्याघ्र मार्ग अस्तित्वात असल्याचे पुन्हा सिद्ध केले आहे. यापूर्वीही कान्हा व्याघ्र प्रकल्पातील वाघ अचानकमारपर्यंत पोहोचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच पेंच व्याघ्र प्रकल्पातील एका वाघिणीने तब्बल ४०० किलोमीटरचा प्रवास करून अचानकमारमध्ये प्रवेश केल्याची नोंद आहे.
दरम्यान, २०२५ मध्ये मध्य प्रदेशात झालेल्या वाघांच्या मृत्यूमुळे वन्यजीव व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यावर्षी केवळ चार महिन्यांत ३२ वाघांचा मृत्यू झाल्याने एनटीसीएने गंभीर दखल घेत राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे.protect tigers green chain वन विभागाच्या माहितीनुसार, अनेक वाघांचा मृत्यू परस्पर संघर्ष, विजेचा धक्का आणि नैसर्गिक कारणांमुळे झाला आहे. काही वाघ आजारपणामुळेही मृत्युमुखी पडल्याचे सांगण्यात आले.
मुख्य वन्यजीव संरक्षक डॉ. समिता राजौरा यांनी सांगितले की, एनटीसीएच्या अधिकाऱ्यांनी बांधवगड परिसराची पाहणी केली असून बहुतांश मृत्यू हे वाघांमधील संघर्षामुळे झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल एनटीसीएला पाठवण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
वाढते शहरीकरण, जंगलांवरील अतिक्रमण आणि अधिवास कमी होत असल्याने वाघांच्या संवर्धनासाठी अशा प्रकारच्या मोठ्या व्याघ्र मार्गाची गरज अधिक तीव्र होत आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास मध्य भारतातील वाघ संवर्धनाला मोठे बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.