आर्वी,
State-of-the-art football ground आर्वी परिसरातील क्रीडा प्रेमींसाठी पर्वणी म्हणून दिलीपराव काळे स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे शहरात प्रथमच फुटबॉल आणि फुटसाल या खेळांसाठी अत्याधुनिक व सर्व सोयींनी सुसज्ज, असे क्रीडांगण कृषक इंग्लिश स्कूलच्या मागे उभारण्यात आले आहे. जिल्ह्यातील अशा प्रकारचे हे पहिलेच मैदान असल्याचा दावा करण्यात आला आहे. ग्रामीण व निमशहरी भागातील खेळाडूंना दीर्घकाळापासून पायाभूत सुविधा, प्रशिक्षित मार्गदर्शक आणि प्रशिक्षणाचा अभाव जाणवत होता. त्यामुळे अनेक प्रतिभावान खेळाडू मागे पडत आहेत. अनुभवी व पात्र प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना मूलभूत कौशल्यांपासून प्रगत तंत्र, शारीरिक तंदुरुस्ती, स्टॅमिना, रणनीती, संघभावना आणि स्पर्धात्मक तयारी यावर विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या उपक्रमामुळे आर्वी व परिसरातील खेळाडू जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वास व्यत करण्यात आला. क्रीडाप्रेमींनी या उपक्रमाचा लाभ घेऊन आर्वीच्या क्रीडा विकासात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाकरिता कृषक शिक्षण सोसायटी व भारत शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष अॅड. शोभा काळे, मुख्याध्यापक प्रणिता हिवसे, मुख्याध्यापक विजय डोळस यांनी शुभेच्छा दिल्या. अलीकडेच पार पडलेल्या समर स्पोर्ट्स कॅम्पला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि विद्यार्थ्यांमधील क्रीडाप्रेम व क्षमता पाहून हा उपक्रम हाती घेण्यात आला. होतकरू खेळाडूंना दर्जेदार सुविधा, योग्य मार्गदर्शन आणि स्पर्धात्मक संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे कृषक शिक्षण संस्था आर्वीचे कोषाध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप काळे यांनी सांगितले.