मुंबई,
Stock market decline देशांतर्गत शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. जागतिक स्तरावरील अस्थिरता, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि पश्चिम आशियातील तणाव याचा थेट परिणाम बाजारावर दिसून आला.बीएसई सेन्सेक्स तब्बल १,३१२ अंकांनी घसरून सुमारे ७६,००० च्या पातळीवर बंद झाला, तर एनएसई निफ्टीमध्येही सुमारे ३६० अंकांची घसरण झाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार मोठ्या घसरणीनेउघडला आणि दिवसाच्या अखेरपर्यंत दबाव कायम राहिला. सलग तिसऱ्या दिवशी बाजार नकारात्मक स्थितीत बंद झाला आहे.
या घसरणीत सेन्सेक्स आणि निफ्टीमधील बहुतांश शेअर्स लाल निशाणीवर बंद झाले. केवळ काही मोजकेच शेअर्स वधारले, तर अनेक मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीय घसरण पाहायला मिळाली. विशेषतः ऑटो, बँकिंग, एनर्जी आणि आयटी क्षेत्रातील शेअर्सवर मोठा दबाव दिसून आला.काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये तीव्र घसरण नोंदवली गेली, तर काही बँकिंग आणि एफएमसीजी शेअर्स तुलनेने स्थिर राहिले. मात्र एकूण बाजारात विक्रीचा दबाव जास्त असल्याचे चित्र दिसले.
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव, आंतरराष्ट्रीय करारांमध्ये होणारा विलंब तसेच कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती या घसरणीमागील प्रमुख कारणे आहेत. याशिवाय रुपयाच्या मूल्यावर आलेला दबाव आणि जागतिक बाजारातील अनिश्चितताही गुंतवणूकदारांच्या भावना प्रभावित करत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या काही आर्थिक आणि संसाधन बचतीसंबंधी विधानांचाही बाजारभावनांवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. एकूणच जागतिक आणि देशांतर्गत घटकांच्या मिश्र परिणामामुळे बाजारात अस्थिरता वाढलेली दिसत आहे.