मुंबई,
Tatkare's reaction to Jai Pawar's statement राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २०२९ च्या मुख्यमंत्रीपदाबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी केलेल्या एका विधानामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेचे वारे वाहू लागले आहेत. जय पवार यांनी सुनेत्रा पवार यांना भविष्यात मुख्यमंत्रीपदासाठी योग्य चेहरा असल्याचे म्हटले होते. बारामतीतील एका कार्यक्रमात बोलताना जय पवार म्हणाले की, अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, ही अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती. आता सुनेत्रा पवार त्या दिशेने मेहनत घेत असून २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत त्या बारामतीतून मैदानात उतरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना त्यांनी सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी, अशीही इच्छा व्यक्त केली.
जय पवार यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही यावर भाष्य केले. रायगड दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात नेतृत्वाबद्दल भावना असतात. जय पवार यांनीही अशाच भावनेतून हे वक्तव्य केले असावे. मात्र राजकारणातील वास्तव लक्षात घेऊन पक्ष काम करत असून राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएसोबतच पुढील वाटचाल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजकारणात नव्या चर्चांना उधाण
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदाररोहित पवार यांनीही या विषयावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, पक्षातील अनेकांची इच्छा अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी होती. कार्यकर्त्यांना एकत्र आणून २०२९ मध्ये सत्ता मिळवण्याचे स्वप्न दादांनीही पाहिले होते. मात्र राज्यात भाजपला विरोध केल्याशिवाय दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री होणे कठीण असल्याचे रोहित पवार यांनी नमूद केले. रोहित पवार म्हणाले की, गेल्या काही महिन्यांतील अजित पवार यांच्या वक्तव्यांमध्येही भाजपविरोधी भूमिका दिसून आली होती. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहायचे असेल तर भाजपला थेट आव्हान द्यावे लागेल, असा सूचक टोला त्यांनी लगावला. जय पवार यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये आणि राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.