चंद्रपूर,
Transfer of Ghodzari and Kanhargaon Sanctuary चंद्रपूर जिल्ह्यातील वन्यजीव संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ‘घोडाझरी’ आणि ‘कन्हारगाव’ या दोन अभयारण्यांची अधिसूचना निघून बरीच वर्षे उलटली असली, तरी अद्याप त्यांचे वन्यजीव विभागाकडे पूर्णतः हस्तांतरण झालेले नाही. प्रशासनाच्या या दिरंगाई विरोधात ‘इको-प्रो’ संस्थेने आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या संदर्भात इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी, प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना पत्र पाठवून आपली तीव्र नाराजी जाहीर केली आहे. ‘घोडाझरी’ अभयारण्याची अधिसूचना 23 मार्च 2018 रोजी, तर ‘कन्हारगाव’ची अधिसूचना 21 मार्च 2021 रोजी काढण्यात आली होती. मात्र, अनुक्रमे 8 व 5 वर्षांचा कालावधी उलटूनही हे वनक्षेत्र अद्याप प्रादेशिक व एफडिसिएम विभागाकडून वन्यजीव विभागाकडे वर्ग करण्यात आलेले नाही. या अभयारण्यांसाठी स्वतंत्र अधिकारी व कर्मचार्यांची पदे मंजूर आहे. मात्र, त्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. कन्हारगाव अभयारण्यासाठी पदांची गरज असून अद्याप मनुष्यबळ उपलब्ध करून दिलेले नाही. अपुर्या मनुष्यबळामुळे अभयारण्यातील वन्यप्राण्यांची अवैध शिकार आणि जंगलतोड होण्याचा धोका आहे.
नुकत्याच लागलेल्या आगीत कन्हारगाव अभयारण्याचे मोठे क्षेत्र जळून खाक झाले, ज्यावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासन असमर्थ ठरले. चंद्रपूर जिल्हा सध्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या विळख्यात आहे. अभयारण्यांचे व्यवस्थापन वन्यजीव विभागाकडे गेल्यास तांत्रिक कौशल्याद्वारे हा संघर्ष कमी करणे शक्य होईल, असे पत्रात नमूद केले आहे. घोडाझरी आणि कन्हारगाव अभयारण्याचे वन्यजीव विभागाकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करावी, अभयारण्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व पदांची तात्काळ भरती करण्यात यावी, या क्षेत्राचा विकास ‘लोकाभिमुख पर्यटन मॉडेल’ म्हणून करावा, जेणेकरून स्थानिक गावांचाही विकास होईल, अशा मागण्या इको-प्रोच्या वतीने करण्यात आल्या आहे.