अंजनगाव तालुक्यात सर्रास वृक्षकटाई

महसूल व वनविभाग गप्प का?

    दिनांक :11-May-2026
Total Views |
अंजनगाव सुर्जी, 
tree-felling : अंजनगाव सुर्जी तालुक्यात सर्वात मोठ्या प्रमाणात सर्रास अवैध वृक्षकटाई होत असून संबंधित शासकीय अधिकारी कोणतीही कारवाई करीत नसल्याने तस्करांना रान मोकळे झाले आहे.
 
 
tree
 
 
 
याबाबत माहिती अशी की, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चौसाळा, निमखेड, कोकर्डा, सातेगाव , भंडाराज, धनेगाव, बोराळा, विहिगाव, चिंचोली तसेच अचलपूर तालुक्यातील शिंदी, कोल्हा- काकडा या शिवारांमधून बंगाली बाभळीचे झाड, कडूनिंब, आडजातीच्या झाडाची मोठ्या प्रमाणात कटाई होत असून कटाई केलेला माल मालवाहू गाडीने बिनधास्त शहरातील काही आरामशीनवर अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने येत आहे. महसूल अधिकारी, मंडल अधिकारी, तलाठी त्याचप्रमाणे वन विभागाचे व पोलिस विभागाचे अधिकारी हे काहीच कारवाई करीत नसल्याची ओरड जनतेत आहे.
 
 
वृक्षकटाईच्या तस्करीमध्ये शहरातील काही तस्करांचा सहभाग मोठा असून हे तस्कर सकाळपासून जंगलातील माल शोधून त्याबाबतचे वृक्षकटाईचे नियोजन आखत असतात. या तस्करांचे मधुर संबंध काही अधिकारी व कर्मचार्‍यांसोबत असल्याची चर्चा सुद्धा शहरात असून संपूर्ण तालुक्यातून वृक्षकटाईचा माल दिवसाढवळ्या शहरात येत असताना अधिकारी व कर्मचारी कारवाई का करत नाही, असा संतप्त सवाल जनतेत केल्या जात आहे. यामुळे महसूल प्रशासन तसेच वन विभागाच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वन विभागाच्या तसेच महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी शहरातील व ग्रामीण भागातील आरामशीनवर येणार्‍या मालाची तपासणी मोहीम सुरू करण्याची मागणी जनतेत केल्या जात आहे. त्याचप्रमाणे या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देणे गरजेचे असून अवैध झाडाच्या कटाईविरुद्ध पोलिसांनी सुद्धा कारवाई करण्याची गरज आहे.
 
 
वृक्षतोड तस्कर पोलिसांना दाखवण्यासाठी झाड तोडण्याचा परवाना सोबत ठेवतात; मात्र, एक झाड तोडण्याची परवानगी असताना दिवसभर अनेक झाडे तोडून तीच परवानगी दाखवण्यात येते. संबंधित विभाग कानाडोळा करून सोडून देतात.