वॉशिंग्टन,
Trump to visit China from May 13 to 15 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दौऱ्याबाबत अधिकृत माहिती समोर आली आहे. हा दौरा १३ ते १५ मे दरम्यान होणार असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले आहे. या दौऱ्यात ट्रम्प यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत महत्त्वपूर्ण भेट होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.ही भेट शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून होत असल्याचे सांगण्यात आले असून, जागतिक राजकीय आणि आर्थिक तणावाच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मध्य-पूर्वेतील संघर्ष, व्यापार धोरणे आणि अमेरिका-चीन संबंधांतील तणाव या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी या दौऱ्यापूर्वी आशावादी भूमिका घेतल्याचे दिसून आले असून, शी जिनपिंग यांच्याकडून त्यांचे स्वागत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे या भेटीत तणावपूर्ण चर्चा होण्याची शक्यता अधिक आहे.याआधीही ट्रम्प यांनी चीनविरोधी व्यापार धोरणे कठोर केली होती. काही काळापूर्वी त्यांनी इराणशी संबंधित प्रकरणांवरून काही देशांवर आयात शुल्क लागू करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे अमेरिका-चीन संबंधांमध्ये सातत्याने चढ-उतार दिसून आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी २०१७ मध्ये चीनला भेट दिली होती, जी मोठ्या राजनैतिक कार्यक्रमात रूपांतरित झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा होणाऱ्या या भेटीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात आहे.