अमरावती,
killed-over-old-dispute : जुन्या वैमनस्यातून अमरावतीत वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घटनेत दोघांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली असून अशा घटनांचे प्रमाण शहरात वाढत आहे.

खोलापुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत २६ एप्रिल रोजी एका तरुणाला तिघांनी बेदम मारहाण केली होती. त्या घटनेतील वैमनस्यातून रविवारी सायंकाळी एका तरुणाची बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आल्याची घटना अकोली परिसरात घडली. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. रवींद्र राजूरकर (वय ३८, रा. अकोली परिसर, अमरावती) असे मृतकाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान दोन मारेकर्यांनी रवींद्र याला दुचाकीवर बसवून अकोली रेल्वेमार्ग परिसरात नेले. तेथे लाठी-काठी तसेच हाताबुक्क्यांनी त्याला बेदम मारहाण केली. मारहाण इतकी गंभीर होती की, त्यामध्ये रवींद्र याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना रात्री नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, या हत्येमागे जुने वैमनस्य कारणीभूत असल्याची माहिती समोर आली आहे. २९ एप्रिलला रात्री खुनातील आरोपींच्या मामाला दोन तरुणांनी गंभीर मारहाण केली होती. त्यावेळी रवींद्र याने आरोपीच्या मामाचे हात पकडून ठेवले होते, तर दोघांनी त्याला मारहाण केली होती. मामाला मारहाण करताना रवींद्रने सहकार्य का केले, या रागातूनच त्या तरुणाचा भाचा व त्याचा मित्र यांनी रविवारी रवींद्रला मारहाण करून त्याची हत्या केली.
दुसरी घटना फ्रेजरपुरा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील शुक्रवारी बाजार परिसरात घडली. येथे पैशांच्या देवाणघेवाणीवरून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्री १:३० वाजेच्या सुमारास घडली. सय्यद नाझीम सय्यद सालार असे मृत तरुणाचे नाव आहे. निशांत रवींद्र भोवते (२७, रा. चपराशीपुरा) आणि यशराज रवींद्र कोरी (२६, रा. देवदत्तनगर, बापटवाडी, अमरावती) असे अटक केलेल्या मारेकर्यांची नावे आहेत. मृत नाझीम हा प्लंबिंगचे काम करत होता. रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास सै. नाझीम हा त्याचा चुलत भाऊ शेख तौसीफ आणि मित्र मोहम्मद शाफीक यांच्यासोबत शुक्रवार बाजार परिसरात फिरत होता. दरम्यान, नाझीमचा निशांत भोवते याच्याशी फोनवर पैशांच्या व्यवहारावरून वाद सुरू झाला. फोनवर बोलत असतानाच नाझीम हा निशांतच्या घराच्या दिशेने गेला. रस्त्याच्या पलीकडे एका मांडा सेंटरसमोरील गल्लीत निशांत भोवते आणि त्याचा मित्र यशराज कोरी (रा. राजापेठ) हे दोघे नाझीमची वाट पाहत उभे होते. तिथे नाझीम पोहोचताच या दोघांनी पुन्हा त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद विकोपाला गेला आणि चिडलेल्या निशांत व यशराजने जवळील चाकूने नाझीमवर हल्ला चढवला. त्यांनी नाझीमच्या गळ्यावर, ओठावर आणि कपाळावर चाकूने सपासप वार केले.
नाझीम रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्याचे पाहून तिथे उपस्थित असलेल्या तौसीफ आणि शाफीक यांनी आरडाओरड केली. मात्र, पकडले जाण्याच्या भीतीने दोन्ही आरोपींनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नाझीमला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे नेण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तक्रारदार शेख तौसीफ यांच्या जबानीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी निशांत भोवते आणि यशराज कोरी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.