आंब्याच्या फळबागेवर अवकाळी वादळाचा कहर

- देवरीच्या भागी येथील प्रकार : शेकडो झाडांवरील फळे जमीदोस्त

    दिनांक :11-May-2026
Total Views |
गोंदिया, 
unseasonal-storm : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होत वादळ व अवकाळी पावसाचा सामना जिल्हावासियांना करावा लागत आहे. त्यात रविवारी १० मे रोजी सायंकाळच्या सुमारास देवरी तालुक्यात आलेल्या वादळी अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांना प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. विशेष म्हणजे, देवरी तालुक्यातील भागी येथील शेतकरी लोकनाथ तितराम यांच्या अमराईवर वादळाने कहरच केला. वादळामुळे त्यांच्या फळबागेतील शंभराहून अधिक झाडांवरील आंबे जमीदोस्त झाली असून तितराम यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
 
 
 
gond
 
 
 
रविवारी झालेल्या जोरदार वादळ व पावसाने मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून शेतकर्‍यांच्या आंब्याच्या फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. अचानक आलेल्या वादळामुळे तितराम यांची आंब्याची फळबाग अक्षरशः जमीनदोस्त झाली. वादळाचा वेग प्रचंड असल्याने फळांनी लगडलेल्या अनेक आंब्याच्या झाडांच्या फांद्या तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे हंगामाच्या तोंडावरच शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यंदा आंब्याला चांगला मोहोर आल्याने उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र अवकाळी पाऊस व वादळी वार्‍यामुळे संपूर्ण मेहनतीवर पाणी फिरले आहे. फळबागांचे नुकसान पाहून शेतकरी हतबल झाले असून शासनाने तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी लोकनाथ तितराम यांनी केली आहे.