भुवनेश्वर,
Young man murdered by stone mafia ओडिशातील नयागढ जिल्ह्यात सोमवारी घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. अवैध दगड वाहतुकीला विरोध करणाऱ्या एका तरुणाची दगड माफियांनी अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत तरुणाची ओळख अजित कुमार साहू अशी झाली आहे. तो रविवारी मध्यरात्री आपल्या साथीदारासह ओडगाव परिसरात अवैध दगड वाहतूक करणारी वाहने थांबवण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी दगड माफियांच्या टोळीने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी अजितवर सपासप वार केले. इतकेच नव्हे तर त्याचे दोन्ही हात तोडून त्याला रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात टाकून आरोपी फरार झाले.

अजितचा साथीदार संतोष कुमार प्रधान कसाबसा जीव वाचवत जवळच्या एका ढाब्यात लपल्याचे सांगितले जात आहे. पहाटे गावकऱ्यांना रस्त्याच्या कडेला अजितचा मृतदेह दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी पुरावे गोळा करत तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून आंदोलन सुरू केले. आरोपींना तात्काळ अटक करावी आणि पीडित कुटुंबाला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.