जि.प. तील लाचखोर कनिष्ठ लिपीक एसीबीच्या जाळ्यात

    दिनांक :11-May-2026
Total Views |
गोंदिया, 
bribery-case : सेवा निवृत्तीचे कागदपत्रे लवकर तयार करून देण्यासह पे फिक्सेशन बरोबर नसल्याचे सांगून १.९२ लाखाची रिकव्हरी वाचवून देण्याच्या नावावर ५० हजार रुपयांची लाच मागणार्‍या जिल्हा परिषदेच्या लेखा विभागातील कनिष्ठ लिपीकाला गोंदियाच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी ११ मे रोजी ४५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. संदेश सांभरे कनिष्ठ लिपीक, जि.प. गोंदिया असे लाचखोर कनिष्ठ लिपीकाचे नाव आहे.
 
 
acb
 
 
 
तक्रारदार हे जिल्हा परिषदेचे सेवा निवृत्त कर्मचारी असून त्यांना सेवा निवृत्तीची कागदपत्रे तयार करायची असल्याने त्यांनी कनिष्ठ लिपीक सांभरे यांच्याकडे प्रस्ताव सादर केले. दरम्यान, ७ मे रोजी आरोपी संदेश सांभरे याने तक्रारदार यांच्याकडे सेवानिवृत्तीची कागदपत्रे लवकर तयार करून देण्यासाठी व त्यांच्या प्रकरणात पे फिक्सेशन बरोबर नसून त्यांच्यावर १ लाख ९२ हजार रुपयांची रिकव्हरी निघत असल्याचे सांगून सदर रिकव्हरी वाचवून देण्याच्या नावावर ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदारांना लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी सोमवारी ११ मे रोजी गोंदिया येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पथकाने सोमवारी दुपारी सापळा कारवाई केली असता आरोपी संदेश सांभरे हा तडजोडीतून ४५ हजार रुपयांची लाच घेताना मिळून आला. बातमी लिहीपर्यंत संबंधित विभागातर्फे कारवाई सुरू होती.