तिवसा,
cattle-rescued : तिवसा पोलिसांनी अवैध गोवंश वाहतुकीविरोधात पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करत मोझरी बायपास परिसरात मध्यरात्री सापळा रचून २१ लहान-मोठ्या गोवंशांची सुटका केली. या कारवाईत एमएच ४० सीटी ०१७२ क्रमांकाचे आयशर वाहन जप्त करण्यात आले असून गोवंश व वाहन असा मिळून २६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध जनावर वाहतूक करणार्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
११ मे रोजी रात्री ११.३० ते पहाटे २ वाजेदरम्यान तिवसा पोलिसांनी मोझरी बायपासवर अमरावतीच्या दिशेने जाणार्या वाहनांवर कडक नजर ठेवत नाकाबंदी केली होती. संशयास्पद वाहनांची कसून तपासणी सुरू असताना एका आयशर वाहनाला थांबवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनामध्ये २१ गोवंशांची अमानुष पद्धतीने कोंबून अवैधरित्या वाहतूक सुरू असल्याचे उघडकीस आले.
याप्रकरणी पोलिसांनी प्रफुल संतोषवार (वय ३६, रा. बुटीबोरी, नागपूर) व हरीश शिवा राठोड (वय ३०, पोराबंदी) यांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात आयशर वाहन व गोवंशांचा समावेश असून एकूण किंमत २६ लाख २० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही उल्लेखनीय कारवाई पोलिस निरीक्षक गोपाल उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत प्रकाश सोनवणे, रवींद्र लांजेवार, नंदू जोगदंड, सागर शिरसागर, रोशन आठवले, सागर डोंगरे तसेच चालक प्रदीप मस्के यांनी धाडसी भूमिका बजावत कारवाई यशस्वी केली.
तिवसा पोलिसांच्या या सतर्कतेमुळे अवैध गोवंश वाहतुकीला मोठा आळा बसला असून, कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.