बाईक टॅक्सीवर सर्जिकल स्ट्राईक! ओला, उबर आणि रॅपिडोचे ॲप्स बंद होणार?

    दिनांक :12-May-2026
Total Views |
मुंबई,
unauthorized-bike-taxi-apps : राज्यात बेकायदेशीरपणे पाय पसरत असलेल्या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांविरोधात परिवहन विभागाने आता कठोर भूमिका घेतली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणी अत्यंत कडक भूमिका घेत ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या कंपन्यांच्या अनधिकृत ॲप सेवा तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. इतकेच नाही तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या कंपन्यांच्या मालकांवर थेट फौजदारी गुन्हे (FIR) दाखल करण्याची मागणी त्यांनी सायबर क्राईम विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडे पत्राद्वारे केली आहे.
 

unauthorized-bike-taxi-apps
 
 
 
मंत्री सरनाईक यांनी पत्रात स्पष्ट केले आहे की, कोणतीही वैध परवानगी किंवा शासनाची मान्यता नसताना या कंपन्या सर्रास प्रवासी वाहतूक करत आहेत. रॅपिडो सारख्या ॲप्समुळे सार्वजनिक सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून, यामध्ये प्रवाशांच्या विम्याची, महिलांच्या सुरक्षिततेची किंवा चालकांच्या चारित्र्य पडताळणीची कोणतीही ठोस यंत्रणा नाही. नुकताच मुलुंड-गोरेगाव लिंक रोडवर एका अनधिकृत बाईक टॅक्सीच्या अपघातात एका महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे, ज्याचा उल्लेख मंत्र्यांनी पत्रात केला आहे. याशिवाय, अशा अवैध व्यवसायांमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या पोटावर पाय येत असल्याने शासनाने ही कठोर पावले उचलली आहेत. कायद्याला न जुमानणाऱ्या या कंपन्यांच्या व्यवस्थापनावर माहिती तंत्रज्ञान आणि मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करून ही व्यवस्था मोडीत काढण्याचा इशारा शासनाने दिला आहे.