‘तेंदूपत्ता’ उठला मजूरांच्या ‘जिवावर’!

अर्जुनी मोरगावात अस्वलाच्या हल्ल्यात पुन्हा एक मजूर जखमी

    दिनांक :12-May-2026
Total Views |
गोंदिया, 
Bear Attack in Arjuni Morgaon जिल्ह्यात सद्या तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू आहे. हा हंगाम मजुरांच्या उदरनिर्वाहाचा मोठा आधार असला, तरी सध्या मजूरांसाठी जीवघेणा ठरत आहे. जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव व देवरी तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या चार घटनांमध्ये चार महिला जखमी तर एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली असताना पुन्हा एक तेंदूपत्ता मजूर अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची पाचवी घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यात मंगळवारी १२ मे रोजी उघडकीस आली आहे. दिपक रतिराम गावळे (४०) रा. भरणोली ता. अर्जुनी मोरगाव असे त्या जखमी मजूराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भरनोली परिसरातील काही मजूर पहाटेच्या सुमारास तीरखुरी सहवन क्षेत्र भाग क्रमांक ९ अंतर्गत नियत क्षेत्र क्रमांक ३ मधील भरनोली जंगल शिवारात तेंदूपत्ता संकलनासाठी गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या एका अस्वलाने अचानक दिपक गावळे यांच्यावर हल्ला केला.
 
 
 
Bear Attack in Arjuni Morgaon
 
 
अस्वलाने गावळे यांच्या मांडीवर व शरीराच्या इतर भागांवर गंभीर जखमा केल्या. प्रसंगी गावळे यांच्या सहकार्‍यांनी आरडाओरड केल्याने अस्वल जंगलाच्या दिशेने पसार झाले. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी केशोरी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच गोठणगाव वनविभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. विशेष म्हणजे, जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलन करणार्‍या मजूरांवर वन्यप्राण्यांकडून होत असलेल्या हल्ल्याची चार दिवसातील ही पाचवी घटना आहे. यापूर्वी ९ मे रोजी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जांभळी/गंधारी व १० मे रोजी वडेगाव बंध्या परिसरात वाघाच्या हल्ल्यात एका जखमी तर एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तर याच कालावधीत देवरी तालुक्यातील देवाटोला, ओवारा व डोंगरगाव जंगल शिवारात अस्वल व रानडुकराच्या हल्ल्यात तीन महिला मजूर जखमी झाल्याच्या घटना घडल्या. या घटना ताज्या असतानाच मंगळवारी पुन्हा अस्वलाच्या हल्ल्याची घटना घडल्याने तेंदूपत्ता संकलन करणार्‍या मजूरांमध्ये असुरक्षीततेची भावना निर्माण झाली आहे. तर तेंदूपत्ता हंगाम मजूरांच्या जिवावर उठल्याचे बोलले जात आहे.