आधी आपल्या पक्षाची अवस्था पाहा!

भाजपा प्रवक्त्याचा राज ठाकरेंना जोरदार टोला

    दिनांक :12-May-2026
Total Views |
मुंबई,
BJP Spokesperson at Raj Thackeray पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला काटकसरीचे आवाहन केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान महाराष्ट्रातही यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत, त्यांनी पंतप्रधानांना सल्ला देण्याऐवजी स्वतःच्या पक्षातील परिस्थितीकडे लक्ष द्यावे, असा सल्ला दिला आहे.राज ठाकरे यांनी अलीकडेच पंतप्रधानांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत काही मुद्दे उपस्थित केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना नवनाथ बन म्हणाले की, जर राज ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या संघटनबळासाठी आणि ध्येयधोरणांसाठी इतका वेळ आणि ऊर्जा वापरली असती, तर त्याचा अधिक उपयोग झाला असता. मात्र ते स्वतःच्या पक्षातील अडचणींकडे दुर्लक्ष करून इतरांवर टीका करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
 
 
Raj Thackeray
 
याच वेळी बन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांच्यावरही टीका केली. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर काही नेते अस्वस्थता व्यक्त करत असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेस आणि यूपीए सरकारच्या काळातील आर्थिक घोटाळे, महागाई आणि शेतकरी आत्महत्यांचा उल्लेख केला. त्या काळात नेते मौन बाळगत होते, मात्र आज वेगळी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
रोहित पवार यांच्यावरही नवनाथ बन यांनी निशाणा साधला. निवडणूक आयोग आणि एसआयआर (SIR) प्रक्रियेवर सातत्याने टीका करणे थांबवावे, असे ते म्हणाले. पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालांचा उल्लेख करत त्यांनी ममता बॅनर्जींच्या प्रभावाविरुद्ध जनतेने भूमिका घेतल्याचा दावा केला. तसेच रोहित पवार यांनी आधी स्वतःच्या मतदारसंघातील आणि पक्षातील परिस्थितीकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. या वक्तव्यांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.