आमगाव,
Canal Bridge on the Amgaon-Virsi Route आमगाव-विरसी ग्रामीण मार्गावरील डाव्या कालव्यावरील पूल अत्यंत जर्जर अवस्थेत पोहोचला असून कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. पुलाच्या कठड्यांना मोठ्या प्रमाणात तडे गेले असून काही भाग कोसळण्याच्या स्थितीत आहे. विशेष म्हणजे या मार्गावरून आमगाव, तिगाव व गोरेगावकडे सतत वाहतूक सुरू असते. त्यामुळे हा पूल पडल्यास संपूर्ण मार्ग अवरुद्ध होऊन नागरिकांना मोठा फटका बसू शकतो. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून पुलावरून जड वाहने जात असताना पूल अक्षरशः डोलत असल्याचे जाणवत आहे. पुलामध्ये निर्माण होणार्या कंपनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुलाची सद्यस्थिती पाहता कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, या गंभीर प्रश्नाकडे जिल्हा बाघ पाटबंधारे व्यवस्थापन विभाग तसेच बाघ इटीयाडोह प्रकल्प विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
पुलाच्या दुरुस्ती अथवा नव्याने बांधकामासाठी अद्याप कोणतेही ठोस नियोजन करण्यात आले नसल्याने संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. या मार्गावरून दररोज शालेय विद्यार्थी, शेतकरी, दुचाकीस्वार तसेच मालवाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. पुलाच्या कठड्यांची पडझड सुरू असताना सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. रात्रीच्या वेळी तर हा पूल अधिक धोकादायक ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने तातडीने पुलाची तांत्रिक पाहणी करून नवीन पूल उभारण्याची प्रक्रिया सुरू करावी, तसेच मोठी दुर्घटना टाळण्यासाठी तत्काळ सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.