'राज्यात इंधनाचा तुटवडा नाही, पण...' छगन भुजबळांची मोठी माहिती

    दिनांक :12-May-2026
Total Views |
मुंबई,
chhagan-bhujbal : राज्यात पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याची ग्वाही अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे संकट निर्माण झाले असले, तरी भारताने आयातीचे धोरण लवचिक ठेवल्यामुळे आपला देश या संकटात मजबुतीने उभा आहे. भारताने इंधन आयात करणाऱ्या देशांची संख्या २७ वरून थेट ५० पर्यंत वाढवल्याने पुरवठा साखळी टिकून आहे. मात्र, जागतिक परिस्थिती पाहता इंधनाचा वापर काटकसरीने करणे गरजेचे असल्याचे मत भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
 
 
 
chhagan-bhujbal
 
 
गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी कडक पावले उचलली जात असून, अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. केंद्र सरकारने शिल्लक गॅस वाटपाचे अधिकार आता राज्याला दिले असून, गरज पडल्यास एलपीजीला पर्याय म्हणून रॉकेल (केरोसिन) वितरणाचा विचार सरकार करत आहे. सध्या रॉकेलचा दर ६१ रुपये असून, पर्यायी इंधन म्हणून त्याचा वापर करण्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मागवण्यात आली आहे. युद्धाच्या अनिश्चिततेमुळे जपानसारख्या विकसित देशांनाही फटका बसला असला, तरी महाराष्ट्र सरकार पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.