'देऊळ बंद २'चा नफा उजळणार शेतकरी मुलांचे भविष्य!

    दिनांक :12-May-2026
Total Views |
शिर्डी,
deool-band-2-movie : मराठी सिनेसृष्टीतील बहुप्रतीक्षित चित्रपट ‘देऊळ बंद २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या निमित्ताने एक अत्यंत स्तुत्य आणि मोठा निर्णय घेतला आहे. या चित्रपटातून मिळणारी सर्व कमाई शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी खर्च केली जाणार असल्याची घोषणा त्यांनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर केली. २०१५ मध्ये गाजलेल्या ‘देऊळ बंद’चा हा दुसरा भाग असून, यावेळी चित्रपटाची कथा एका महिला शेतकऱ्याभोवती फिरणारी आहे. ही महिला चक्क स्वामींचीच परीक्षा घेताना दिसणार असून, चित्रपटाच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या, हमीभाव, बोगस बियाणे आणि कृषी क्षेत्रातील भ्रष्टाचारावर कडाडून प्रहार करण्यात आला आहे.
 

deool-band-2-movie 
 
आत्महत्या हा कोणत्याही प्रश्नावरचा उपाय नसून, काळानुसार शेतीमध्ये बदल आणि अभ्यासपूर्ण निर्णय घेण्याची गरज आहे, असा संदेश प्रवीण तरडे यांनी या चित्रपटातून दिला आहे. २१ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थांच्या भूमिकेत दिसणार आहेत. "सरकारं बदलली तरी शेतकऱ्यांचे प्रश्न तेच राहतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःच आपली उत्तरे शोधली पाहिजेत," असे मत तरडे यांनी मांडले आहे. केवळ मनोरंजन न करता सामाजिक बांधिलकी जपत चित्रपटाचा नफा थेट शेतकऱ्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी देण्याच्या त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.