चंदौली,
Deranged Accused Shot Dead in Encounter उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यात सलग तीन हत्यांनी खळबळ उडाली होती. अवघ्या २४ तासांत तिन्ही हत्या करून दहशत निर्माण करणाऱ्या एका माथेफिरू आरोपीला अखेर पोलिसांनी चकमकीत ठार केले. स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी), अलीनगर पोलीस, सकलदिहा पोलीस आणि जीआरपीच्या संयुक्त कारवाईत ही कारवाई करण्यात आली. मृत आरोपीची ओळख पंजाबमधील अमृतसर येथील रहिवासी गुरप्रीत सिंग अशी झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने कोणतेही वैयक्तिक वैर नसताना निष्पाप लोकांना लक्ष्य करत गोळीबार केला होता. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गुरप्रीत २०२१ मध्ये सैन्यातून बाहेर पडला होता. त्यानंतर तो घरीच राहत होता आणि त्याला दारूचे व्यसन लागले होते. बिहारमधील आरा येथे सुरक्षा रक्षकाची नोकरी गेल्यानंतर त्याची मानसिक स्थिती बिघडल्याचे सांगितले जात आहे.१० मे रोजी त्याने पहिली हत्या अलीनगर परिसरातील दरियापूर गावाजवळ ताडीघाट पॅसेंजर ट्रेनमध्ये केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रात्री जम्मू तवी एक्सप्रेसमधील एका प्रवाशावर गोळीबार करून त्याचा जीव घेतला. यानंतर सोमवारी सकाळी अलीनगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेच्या डोक्यात गोळी झाडून त्याने तिसरी हत्या केली. या चकमकीत जीआरपीच्या एका हेड कॉन्स्टेबलसह दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीकडून एक रिव्हॉल्वर, जिवंत काडतुसे आणि कापलेली डीबीबीएल बंदूक जप्त करण्यात आली. बंदुकीचा परवाना सापडला असला तरी रिव्हॉल्वरसंदर्भातील कागदपत्रे पोलिसांना मिळाली नाहीत. पोलिस अधीक्षकांनी या संपूर्ण कारवाईला दुजोरा दिला असून पुढील तपास सुरू आहे.