भंडारा,
dongargaon-zilla-parishad-school : जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेचे मुख्याध्यापक प्रत्यक्ष शाळेत हजर नसतानाही, त्यांनी हजेरी पुस्तकावर दोन दिवस आधीच स्वाक्षऱ्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे डोंगरगावचा प्रकार उघडकीस आला, पण असे प्रकार जिल्ह्यातील इतरही शाळांमध्ये होत असल्याची चर्चा आता पुढे येऊ लागली आहे.

सध्या शाळेतील अध्यापन बंद असल्याने विद्यार्थ्यांना सुट्या असल्या तरी शाळेचे कार्यालयीन काम मात्र सुरू आहे. त्यामुळे शिक्षक मुख्याध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांनी येणे बंधनकारक आहे. डोंगरगाव येथील जिल्हा परिषद हायस्कुल येथे उघडकीस आलेला प्रकार विचित्रच आहे. सध्या शाळा सकाळ पाळीत सुरू आहेत. त्यामुळे 7.30 पर्यंत मुख्याध्यापकासह शिक्षकांनी येणे अपेक्षित आहे. मात्र 11 रोजी शाळा भरण्याची वेळ होऊनही एकही शिक्षक किंवा मुख्याध्यापक मुकरण कुर्जेकर शाळेत पोहोचले नव्हते. शाळेतील शिपाई वेळेवर हजर होत्या आणि त्यानेच शाळा उघडली. मात्र, जेव्हा शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि काही पालकांनी शाळेत जाऊन हजेरी पुस्तकाची (मस्टर) पाहणी केली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. मुख्याध्यापक प्रत्यक्ष शाळेत आले नसतानाही, त्यांच्या नावासमोर पुढील दोन दिवसांची आगाऊ हजेरी (स्वाक्षरी) आधीच लागलेली होती.
शाळेतील या बेशिस्त कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालक विजय कुंभलकर यांनी केला आहे. शिक्षक वेळेवर येत नाहीत आणि मुख्याध्यापक चक्क घरी बसून हजेरी लावतात, हा प्रकार अत्यंत गंभीर आहे," अशा भावना त्यांनी व्यक्त केली . याप्रकरणी शाळेच्या चपराशाने आणि पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली असून संबंधित मुख्याध्यापकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हा प्रकार केवळ डोंगरगाव पुरता मर्यादित नसून जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये अशाच प्रकारे 'अडव्हान्स हजेरी'चा पायंडा पडल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. ग्रामीण भागातील शिक्षकांच्या या निष्काळजीपणामुळे जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मुख्याध्यापकाचा हा प्रताप समोर आल्यानंतर आता जिल्हा परिषद शिक्षण विभाग याकडे गांभीर्याने पाहणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मी शाळेतच होतो : प्राचार्य
सोमवारी 11 रोजी मी शाळेतच होतो. शाळेत जाऊनच हजेरी बुकावर स्वाक्षरी केली. शिपाई येण्यापूर्वीच शाळेत सही करून मी बाहेर गेलो. आगाऊ स्वाक्षऱ्या करून ठेवल्या नसल्याची प्रतिक्रिया शाळेचे प्राचार्य मकरन कुर्जेकर यांनी तभाशी बोलताना दिली.