१०० कोटींचे ड्रग्ज तयार करण्याचा कट पोलिसांनी उधळला

    दिनांक :12-May-2026
Total Views |
मुंबई,
drug-trafficking-arrests : मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात एक मोठी मोहीम फत्ते केली असून, आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल १०० कोटी रुपयांचे 'मेफेड्रोन' (MD) ड्रग तयार करण्याचा तस्करांचा कट उधळून लावला आहे. पोलिसांनी या कारवाईत सुमारे ४ लाख रुपयांचा कच्चा माल आणि रसायने जप्त केली आहेत. विशेष म्हणजे, जर या कच्च्या मालावर प्रक्रिया झाली असती, तर त्यातून १०० कोटींचे घातक ड्रग्ज तयार होऊन ते मुंबई आणि आसपासच्या परिसरात विकले जाणार होते. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन महिलांसह एकूण १३ जणांना बेड्या ठोकल्या असून, अंमली पदार्थांच्या काळ्या बाजाराला मोठा दणका दिला आहे.
 
 
drugs
 
 
 
या कारवाईची सुरुवात एप्रिल महिन्यात झाली होती, जेव्हा पोलिसांनी मीरा रोड परिसरातून फिरदोस अरबाज कुरेशी नावाच्या महिलेला २.६६ कोटी रुपयांच्या एमडीसह अटक केली होती. फिरदोस आणि तिचा पती अरबाज यांची कसून चौकशी केली असता, ड्रग्ज बनवण्यासाठी मोठा कच्चा माल येणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी तातडीने सापळा रचून १३.६१ कोटींचे तयार एमडी आणि २५५ किलो रसायने, सोडियम हायड्रॉक्साईड, हायड्रोक्लोरिक ॲसिड तसेच लॅबची उपकरणे जप्त केली. पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे शेकडो तरुण पिढीला बरबाद करण्याच्या तस्करांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बदाख आणि उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिली.