मुंबई,
Earthquake in the Stock Market भारतीय शेअर बाजारात मंगळवारी प्रचंड घसरण झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 105 डॉलरच्या पुढे गेल्याने आणि रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचल्याने बाजारात जोरदार विक्रीचा दबाव दिसून आला. यामुळे सेन्सेक्स तब्बल 1456 अंकांनी घसरला, तर निफ्टी 23,400 च्या खाली बंद झाला.बाजार बंद होताना सेन्सेक्स 74,559.24 अंकांवर स्थिरावला, तर निफ्टी 23,379.55 वर बंद झाला. दिवसभरात दोन्ही निर्देशांकांमध्ये मोठी घसरण दिसून आली. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स 74,449.50 आणि निफ्टी 23,348.40 या नीचांकी पातळीपर्यंत खाली गेला होता.

या घसरणीमुळे एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 10 लाख कोटी रुपयांहून अधिक घट झाली आहे. बीएसईवरील कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य मोठ्या प्रमाणात कमी झाले असून, बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने भारतासारख्या आयात-आधारित अर्थव्यवस्थेवर मोठा दबाव आला आहे. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे महागाई वाढण्याची शक्यता आणि चालू खात्यातील तूट वाढण्याची भीती गुंतवणूकदारांमध्ये दिसून आली. याच पार्श्वभूमीवर परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली.
रुपया देखील डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचल्याने बाजारातील नकारात्मकता आणखी वाढली. याचा थेट परिणाम आयटी, रिअल्टी आणि ऑटो क्षेत्रावर झाला असून या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली.मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही मोठी पडझड झाली असून अनेक समभाग 2 ते 3 टक्क्यांनी घसरले आहेत. एकूण बाजारात घसरणीचा कल स्पष्ट दिसून आला, तर वाढणाऱ्या शेअर्सची संख्या अत्यंत मर्यादित होती.