मुंबई,
nitesh-rane : जागतिक स्तरावर जाणवणाऱ्या इंधनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी आणि परकीय चलनाची बचत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली नितेश राणे यांनी आपल्या विभागातील कामकाजात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला असून, यापुढे विभागाच्या सर्व महत्त्वाच्या बैठका प्रामुख्याने 'ऑनलाइन' पद्धतीने पार पडतील. यामुळे मुंबईतील मंत्रालय किंवा इतर ठिकाणी होणाऱ्या बैठकांसाठी अधिकाऱ्यांना करावा लागणारा प्रवास टाळता येईल, परिणामी इंधनाची मोठी बचत होईल.

केवळ ऑनलाइन बैठकांवरच न थांबता, इंधनावरील अवलंबित्व पूर्णपणे कमी करण्यासाठी विभागात इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) वापर वाढवण्याच्या सूचनाही मंत्र्यांनी दिल्या आहेत. प्रशासकीय कामात तंत्रज्ञानाचा वापर वाढवून कामाचा वेग वाढवणे आणि त्याचवेळी पर्यावरणाचे रक्षण करणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. ऊर्जा बचत हे राष्ट्रीय कर्तव्य असून पर्यावरणाचे रक्षण आणि देशाची आर्थिक स्थिती संतुलित राखण्यासाठी प्रत्येक विभागाने अशा प्रकारे पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत नितेश राणे यांनी व्यक्त केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने सुरू करण्यात आली असून, यामुळे विभागाच्या खर्चात कपात होऊन प्रशासकीय कार्यक्षमता सुधारण्यास मदत होणार आहे.