तलावातील गाळ काढल्याने शेतीला नवजीवन-जि.प. अध्यक्ष भेंडारकर

गाळमुक्त धरण योजनेअंतर्गत इंजोरी व येरंडी देवी येथे भूमिपूजन

    दिनांक :12-May-2026
Total Views |
अर्जुनी मोरगाव, 
Injori and Yerandi Devi तालुक्यातील इंजोरी व येरंडी देवी येथे राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला. अनेक वर्षांपासून तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने जलसाठा कमी होत होता. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर परिसरात पाण्याची टंचाई निर्माण होत होती. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून तलावातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. प्रसंगी कार्यक्रमात बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी सांगितले की, जलसंधारण ही काळाची गरज असून तलावातील गाळ काढल्याने पाणीसाठा वाढेल, भूजलपातळी सुधारेल आणि शेतकर्‍यांना सिंचनासाठी मोठा आधार मिळेल. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना ग्रामीण भागासाठी अत्यंत उपयुक्त असून यामुळे शेतीला नवे जीवन मिळणार आहे.
 
 

Injori and Yerandi Devi 
 
 
या कामामुळे तलाव अधिक खोल व स्वच्छ होणार असून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साठवता येणार आहे. परिणामी परिसरातील शेतीला वर्षभर पाण्याची उपलब्धता राहण्यास मदत होणार आहे. तसेच विहिरी, बोअरवेल आणि शेततळ्यांमधील पाण्याची पातळी वाढण्यासही या उपक्रमाचा फायदा होणार असल्याचे सांगितले. यावेळी पंचायत समिती उपसभापती संदीप कापगते, माजी उपसरपंच काशिनाथ कापसे, माजी सरपंच रवींद्र खोटेले, पोलिस पाटील डाकराम मेंढे, लालाजी शिवणकर, बालू नेवारे, संतोष मेश्राम, गणेश ब्राह्मणकर, संजय तवाडे, आनंदराव दोनोडे, जलसंधारण अधिकारी दहिवले, राजकुमार बडोले, विपिन शहारे, सुदोधन मेश्राम यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
...