अमरावती,
ravi-rana : बडनेरा येथील कोंडेश्वर-अलियाबाद परिसरात उभारण्यात येणार्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेवरील वन आरक्षण काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाविद्यालयासाठी तीच जागा निश्चित करण्यात आ. रवी राणा यांना यश आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ ऑक्टोबर २०२४ रोजी आभासी भूमिपूजन करून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवी झेंडी दाखविली होती. यावेळी कोंडेश्वर-अलियाबाद येथे झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी प्रामुख्याने आ. रवि राणा, तत्कालीन खासदार नवनीत राणा, राज्यसभा खासदार अनिल बोंडे तसेच विविध प्रशासकीय अधिकारी प्रमुख उपस्थित होते. बडनेरा मतदारसंघासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. दरम्यान, या जागेवर वन विभागाचे आरक्षण असल्याचे समोर आले होते. हा मुद्दा घेऊन आ. रवि राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आरक्षण काढून कोंडेश्वर-अलियाबाद येथील जागेवरच महाविद्यालय उभारण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या जागेवरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा अंतिम निर्णय घेत शिक्कामोर्तब केले आणि आरक्षण काढण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले. तसे पत्र ७ मे रोजी काढण्यात आले आहे.
आता जागेबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एकूण प्रकल्पासाठी सुमारे १६०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ४०३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आ. रवि राणा यांनी दिली. या प्रकल्पामुळे अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची मोठी संधी उपलब्ध होणार असून आरोग्य सुविधांमध्येही मोठी भर पडणार आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची जागा बदलविण्याच्या मुद्दावरून कोणीही राजकारण करू नये, असा सल्लाही आ. राणा यांनी दिला. हा प्रकल्प जनतेच्या हिताचा असून सर्वांनी विकासाच्या दृष्टीने एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान, मुख्यमंत्री, महसूल मंत्री यांचे आ. राणा यांनी आभार मानले आहे.