मुंबई,
yellow-alert : राज्यात सध्या हवामानाची दोन टोकाची रूपे पाहायला मिळत असून, एका बाजूला काही भागांत पावसाची हजेरी असतानाच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मात्र उन्हाचा तांडव सुरू झाला आहे. जळगाव जिल्ह्याने सोमवारी उष्णतेचा उच्चांक गाठला असून, तिथे तब्बल ४४.५°C तापमानाची नोंद झाली आहे. या वाढत्या तापमानामुळे जळगाव शहराची तहान भागवणाऱ्या वाघूर धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटला असून बाष्पीभवनाचा वेग १५ टक्क्यांनी वाढल्याने पाणीटंचाईचे संकट गडद होत आहे. भारतीय हवामान विभागाने जळगाव, नाशिक, धुळे आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांसाठी 'येलो अलर्ट' जारी केला असून, दुपारी १२ ते ४ या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे कडक आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर जरी तापमानाचा आकडा ३५ अंशांच्या आसपास असला तरी समुद्राजवळील दमट हवेमुळे उकाड्याने अंगाची लाहीलाही होत आहे. वाढत्या उन्हाच्या झळा आणि उष्णघाताचा धोका लक्षात घेता आरोग्य विभागाने ठिकठिकाणी विशेष कक्ष कार्यान्वित केले आहेत. नागरिकांनी स्वत:ला हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे, हलके सुती कपडे वापरणे आणि उन्हापासून संरक्षण करण्यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मान्सून लवकर येण्याचे संकेत असले तरी सध्याच्या तीव्र उन्हामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले असून पावसाची प्रतीक्षा वाढली आहे.