चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणाचा मोठा निर्णय, तपास सीबीआयकडे

    दिनांक :12-May-2026
Total Views |
कोलकत्ता,
chandranath rath पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या चंद्रनाथ रथ यांच्या हत्येच्या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या चंद्रनाथ रथ यांच्या हत्येने राज्यात मोठी खळबळ उडवली होती. या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, आता संपूर्ण तपासाची सूत्रे सीबीआयकडे जाणार आहेत.
 
 
chandranath rath
 
बंगाल सरकारच्या शिफारशीनंतर हा तपास राज्य पोलिसांकडून सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. डीओपीटीकडून याबाबत अधिकृत अधिसूचना जारी करण्यात येणार असून त्यानंतर सीबीआय औपचारिकपणे तपास सुरू करेल. सूत्रांच्या माहितीनुसार, या संवेदनशील प्रकरणासाठी सात डीआयजी दर्जाच्या अधिकाऱ्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
चंद्रनाथ रथ यांची ६ मे रोजी रात्री अंदाजे १०.३० ते ११.०० च्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ते उत्तर २४ परगणा येथील आपल्या निवासस्थानी जात असताना ही घटना घडली. त्यांच्या वाहनाला मागून आलेल्या कारने ओव्हरटेक करून अचानक गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी अस्थिरता निर्माण झाली होती.
या हत्येप्रकरणी पोलिसांनी बिहार आणि उत्तर प्रदेशातील तीन आरोपींना अटक केली आहे.chandranath rath यामध्ये बिहारमधील मयंक राज मिश्रा आणि विकी मौर्य यांचा समावेश असून, उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील राज सिंग यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. तिघांचीही सध्या चौकशी सुरू आहे. विशेष तपास पथकाने या आरोपींच्या भूमिकेचा सखोल तपास सुरू ठेवला होता.
या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे गेल्याने पुढील तपास अधिक वेगाने आणि विस्तृत पद्धतीने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील संवेदनशील स्वरूप पाहता हा तपास केंद्राकडे सोपवणे महत्त्वाचे मानले जात आहे.